मोदी सरकारने जागतिक स्तरावर योगासंदर्भात जनजागृती केल्यामुळे अनेक देशांना करोनाशी लढायला मदत झाली आहे असे वक्तव्य केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केलं आहे. शुक्रवारी नाईक पणजी येथे करोना उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘आयुष’ ६४ ’औषधाच्या वितरणाच्या प्रसंगी ते बोलत होते.

“नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सात वर्षापूर्वी २१ जून या दिवशी जागतिक स्तरावर योग दिन साजरा करण्यास सुरुवात केली होती. ज्यामुळे योगाबद्दल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरुकता निर्माण झाली,” असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगतले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

“आता अनेक देशांना करोनाशी लढण्यासाठी योगाचे किती महत्त्व आहे हे कळलं आहे. कारण त्यांना याच्या फायद्याबद्दल माहिती देण्यात आली आहे,” असे नाईक म्हणाले. पंतप्रधान मोदींना दूरदर्शी नेते म्हणत त्यांनी मानवी जीवनातील शारिरीक, मानसिक आणि आध्यात्मिक पैलूंवर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्राचीन प्रथेविषयी जगाला जागृत केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

कोविड -१९ उपचारांमध्ये राज्य सरकार आयुष (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) च्या चिकित्सकांची मदत घेत असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. “राज्यातील सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये आयुष क्लिनिक देखील सुरू करण्यात आले आहेत, जेथे कोविडमधून बरे झाल्यानंतर इतर आरोग्यविषयक येणाऱ्या समस्यांवर उपचार केले जातात असे,” सावंत म्हणाले.

दरम्यान, अ‍ॅलोपॅथीबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या योगगुरू रामदेव बाबा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ‘भारतीय वैद्यकीय संघटने’नेच्या डॉक्टरांनी केली होती. त्यानंतर आता केंद्रीय मंत्र्यांनी योगामुळे जगभरातील देशांनी करोना मात केली आहे असे म्हटले आहे.