गुजरातमध्ये सौराष्ट्रच्या काही भागांमध्ये पावसाची तीव्रता बुधवारी कमी झाली असली; तरी खेड्यांना जोडणारे रस्ते पुरामुळे बंद असल्याने आणि काही भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याने या भागातील अनेक खेड्यांचा मुख्य भागापासून संपर्क तुटला आहे.

पूरपरिस्थितीमुळे १५७ रस्ते बंद असल्याने वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे. यात जामनगर जिल्ह्यातील एक राष्ट्रीय महामार्ग; राजकोट, जामनगर, जुनागढ, भावनगर, अमरेली व सुरत जिल्ह्यांतील १७ राज्य महामार्ग आणि खेड्यांना जोडणारे १२७ पंचायत मार्ग यांचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दक्षिण गुजरातमधील सुरत जिल्ह्याला बुधवारी मुसळधार पावसाने तडाखा दिला. राज्याच्या तुरळक भागांत शनिवार सकाळपर्यंत जोरदार ते अतिशय जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

बसची दररोज वाहतूक होणारे १६५ मार्ग बंद असल्याने बसच्या ५२२ फेऱ्या चालवणे आपल्याला शक्य नसल्याचे राज्य परिवहन महामंडळाने म्हटले आहे. यापैकी बहुतांश मार्ग जामनगर, जुनागड जिल्ह्यातील असून रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाचा त्यांना सर्वात जास्त फटका बसला आहे.  राजकोट, जामनगर व पोरबंदर जिल्ह्यातील ३ मोठ्या धरणांमधून नद्यांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात सोडले जात असल्याने या जिल्ह्यातील ४८ खेडी प्रभावित होण्याची शक्यता आहे.