न्यायालयाचे निरीक्षण

नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सदर व्यक्तीवर खोटेनाटे आरोप करण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. वैयक्तिक सूड घेण्यासाठी महिला अनेकदा कायद्याचा शस्त्र म्हणून वापर करतात, असे निरीक्षणही न्यायालयाने या वेळी नोंदविले.

अनेक प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की, महिला स्वखुशीने शारीरिक संबंध ठेवतात आणि एखाद्या कारणावरून दोघांमध्ये जेव्हा दुरावा निर्माण होतो तेव्हा महिला वैयक्तिक सूड घेण्यासाठी कायद्याचा शस्त्र म्हणून वापर करतात, असे अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती संजीव जैन यांनी म्हटले आहे.

बलात्काराचा आरोप करण्यात आलेल्या व्यक्तीशी आपण नोकरीनिमित्ताने संपर्कात होतो, परंतु १२ डिसेंबर २०१३ रोजी त्याने आपल्यावर त्याच्या गाडीतच बलात्कार केला, या प्रकाराची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकीही त्याने दिली, अशी महिलेची तक्रार होती. आरोपीविरुद्ध एफआयआरही नोंदविण्यात आला होता. मात्र, तक्रारदाराच्या साक्षीत सातत्य आणि सयुक्तिकपणाचा अभाव होता, असे कारण देऊन न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाल्याने महिलेने खोटी तक्रार नोंदविली होती. नोकरी मिळाल्यास त्यापोटी दलाली देण्यावरून दोघांमध्ये भांडण झाले होते.