काठमांडू : नेपाळ राष्ट्र बँकेने (एनआरबी) गुरुवारी देशाचा सुधारित नकाशा असलेल्या १०० रुपयांच्या नवीन नोटा जारी केल्या. परंतु त्यामध्ये वादग्रस्त कलापाणी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा प्रदेशांचा समावेश आहे. भारताने या कृतीला कृत्रिम विस्तार म्हटले आहे. नवीन नोटेवर माजी गव्हर्नर महाप्रसाद अधिकारी यांची स्वाक्षरी असून, बँक नोट जारी करण्याची तारीख ‘२०८१ बीएस’ नमूद केली आहे, जी मागील वर्ष २०२४ दर्शवते.
पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात, नेपाळने मे २०२० मध्ये संसदेच्या मंजुरीद्वारे कलापाणी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा प्रदेशांचा समावेश असलेला नकाशा अद्ययावत केला होता. नोटेवरील अद्ययावत केलेल्या नकाशाबाबत स्पष्टीकरण देताना, ‘एनआरबी’च्या प्रवक्त्याने सांगितले की जुन्या १०० रुपयांच्या नोटेवर नकाशाचा समावेश आहेच आणि सरकारच्या निर्णयानुसार तो सुधारित करण्यात आला आहे. नेपाळमध्ये १०, ५०, ५०० आणि १००० रुपयांच्या विविध मूल्यांच्या नोटांव्यतिरिक्त केवळ १०० रुपयांच्या नोटेवर नेपाळचा नकाशा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नेमका वाद काय?
भारत आणि नेपाळमध्ये काली नदीच्या उगमाच्या आणि सीमेच्या व्याख्येमुळे वाद निर्माण झाला आहे. नेपाळ दावा करतो की काली नदीचा उगम लिम्पियाधुरा येथे होतो आणि त्यामुळे हे तीनही प्रदेश नेपाळमध्ये येतात. तर नदीचा उगम कालापानीजवळ आहे आणि त्यामुळे हे क्षेत्र भारताच्या उत्तराखंडमध्ये आहे, असे भारताचे म्हणणे आहे. या वादामुळे दोन्ही देशांमध्ये अनेक दशकांपासून तणाव आहे.
