दुखापतीवर मात करण्यासाठी उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्याची आणि यासंदर्भातील चाचणीत आपण दोषी असल्याची धक्कादायक कबुली माजी ग्रँड स्लॅम विजेती टेनिसपटू मारिया शारापोव्हाने दिली आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या वेळी घेण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीत शारापोव्हा दोषी आढळली आहे. त्यामुळे शारापोव्हावर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडून (आयटीएफ) तात्पुरती बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिला अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रायोजकत्वावर पाणी सोडावे लागेल.
शारापोव्हा ही मेल्दोनियम हे ऊर्जा वाढवणारे औषध २००६पासून नियमित घेत आहे. मात्र यंदा बंदी घालण्यात आलेल्या औषधांच्या यादीत या उत्तेजकाचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत शारापोव्हा म्हणाली, ‘‘साऱ्या घटनेची मी नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे. अक्षम्य चुकीमुळे मी माझ्या असंख्य चाहत्यांची निराशा केली आहे. ज्या क्रीडा प्रकारात मी वयाच्या चौथ्या वर्षांपासून भाग घेत आहे, त्या खेळाच्या प्रतिष्ठेला तडा देण्याचा प्रयत्न माझ्याकडून नकळत झाला आहे. या चुकीबद्दल खूप गंभीर शिक्षा होणार आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे.