Marital Rape : चिरैय्या ही वेब सीरिज हॉट स्टार या ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. या वेबसीरिजचा विषय हा अत्यंत संवेदनशील असा आहे. ‘मॅरिटल रेप’ अर्थात विवाह बलात्काराच्या मुद्द्यावर ही वेबसीरिज भाष्य करते. या वेबसीरिजला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तसंच यामुळे मॅरिटल रेपचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आपण जाणून घेऊ याबाबत भारतात काय तरतूद आहे.
चिरैय्या वेबसीरिजची कथा थोडक्यात काय?
चिरैय्या वेबसीरिजची कथा ही लखनऊमध्ये राहणाऱ्या एका उच्चभ्रू घरातली आहे. या घरची मोठी सून कमलेश (दिव्या दत्ता) ही पारंपारिक आणि सुसंस्कृत म्हणवली जाणारी सून आहे. सासू-सासरे यांचा शब्द तिच्यासाठी प्रमाण आहे. तसंच तिला तिच्या दिराचाही अभिमान आहे कारण त्याला तिने मुलासारखं सांभाळलेलं आहे. आपला दिर कधीही चूक करु शकत नाही असं कमलेशला वाटत असतं. अरुणचं म्हणजेच कमलेशच्या दिराचं लग्न पूजाशी (प्रसन्ना बिष्ट) होतं. लग्नाच्या पहिल्या रात्रीच तो पत्नीच्या इच्छेविरोधात तिच्याशी शरीरसंबंध ठेवतो. पुढेही हे प्रकार वाढतात. स्वतंत्र विचारांची पूजा तेव्हा बंड करते. आवाज उठवते. सुरुवातीला कमलेश तिला साथ देत नाही. पण नंतर दोघी मिळून हा लढा कसा देतात? याची कथा चिरैय्या मध्ये दाखवण्यात आली आहे. कमलेश सगळं ऐकून आधी खचून जाते पण जेव्हा तिला परिस्थिती लक्षात येते तेव्हा ती दीराला म्हणजेच अरुणला शिक्षा करायचा निर्णय घेते. वैवाहिक बलात्काराचा कायदा भारतात अस्तित्वात नाही. मग कमलेश पूजाला न्याय मिळवून देते का? या प्रश्नाच्या उत्तराचा प्रवास म्हणजे ही वेबसीरिज. शशांक शाह यांनी या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. वैवाहीक बलात्कार यासारख्या गंभीर आणि संवेदनशील विषयाला हाताळण्याचा हा एक चांगला प्रयत्न आहे.

काय आहे मॅरिटल रेप किंवा वैवाहिक बलात्कार?
विवाहानंतर पत्नीच्या सहमतीशिवाय तिच्या पतीने जर तिच्याशी शरीर संबंध ठेवले तर त्याला वैवाहिक बलात्कार किंवा मॅरिटल रेप असं म्हटलं जातं. भारतीय दंड संहिता या गोष्टीला गुन्हा मानत नाही. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७५ मध्ये बलात्कार या विषयाची व्याख्या दिली आहे. त्यामध्ये हे म्हटलं आहे जर विवाहानंतर पती त्याच्या पत्नीसह शरीर संबंध किंवा लैंगिक संबंध प्रस्थापित करत असेल तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही. जर पत्नी अल्पवयीन असेल तरीही शरीर संबंध ठेवले गेले तर मात्र तो बलात्कार ठरेल. स्पष्टच सांगायचं झालं तर वैवाहिक बलात्काराचा कुठलाही उल्लेख हा या कलमात नाही.

डॉ. विकास दिव्यकिर्ती यांनी काय म्हटलं होतं?
१) डॉ. विकास दिव्यकिर्ती यांनी असं म्हटलं आहे की मॅरिटल रेपला गुन्हा मानलं गेलं पाहिजे. जस्टिस वर्मा यांचा अहवाल आला होता त्यातही ही मागणी करण्यात आली होती की मॅरिटल रेपला गुन्हा मानलं गेलं पाहिजे. मात्र अद्याप अशी तरतूद आपल्याकडे कायद्याने नाही.
२) २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला होता त्यात सर्वोच्च न्यायालयात १८ वर्षांपेक्षा पत्नीचं वय कमी असेल आणि पतीने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले तर तो बलात्कार मानला जाईल.
३) सरकार मॅरिटल रेपला गुन्हा मानता येणार नाही असं म्हणतं आहे. कारण यामुळे समाजाचा पाया कोसळून जाईल असं सरकारला वाटतं आहे. डी. वाय चंद्रचूड CJI असताना याबाबतचा निर्णय होणार होता. पण तो झाला नाही. असे मुद्दे २०२४ च्या पॉडकास्टमध्ये विकास दिव्यशक्ती यांनी मांडले होते.
केंद्र सरकारचं २०२२ मधलं उत्तर काय?
पती त्याच्या पत्नीसह शरीर संबंध ठेवत असेल आणि त्याला जर मॅरिटल रेप म्हटलं गेलं तर त्याचा समाजावर आणि वैवाहीक संबंधांवर गंभीर परिणाम होईल.
मॅरिटल रेप हा गुन्हा घोषित करण्याची आवश्यकता नाही कारण याबाबत इतर शिक्षांची तरतूद भारतीय कायद्यामध्ये आहे.
भारतात मॅरिटल रेप हा गुन्हा आहे का?
भारतात मॅरिटल रेप हा गुन्हा नाही. मात्र सरकारी आकडेवारीनुसार भारतातील एकूण विवाहीत महिलांपैकी ६.१ टक्के महिलांना लैंगिक हिंसेला तोंड द्यावं लागतं. अद्यापही भारतात मॅरिटल रेप हा गुन्हा नाही.
पाकिस्तान, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया या देशांमध्येही मॅरिटल रेप हा गुन्हा नाही.
मॅरिटल रेप अर्थात वैवाहिक बलात्काराला गुन्हा मानलं जावं यासाठी मागच्या अनेक वर्षांमध्ये सर्वोच्च न्यायालयांमध्ये विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. तरीही याबाबत ठोस असा कायदा झालेला नाही.
सर्वोच्च न्यायालयातल्या वकिलांनी काय निरीक्षणं नोंदवली होती?
Domestic Violence अर्थात घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांचा अभ्यास करणारे अॅडव्होकेट अनुराग यांनी म्हटलं आहे की लग्न झालं म्हणजे एखाद्या व्यक्तीची सामाजिक ओळख संपत नाही. पती आणि पत्नी असणं याशिवाय त्या दोघांचीही एक स्वतंत्र अशी ओळख असतेच. पती आणि पत्नी असणं याशिवाय जी स्वतंत्र ओळख असते ती असणं हा त्यांचा नैतिक अधिकार आहे. त्यामुळे पती पत्नी असतील तरीही शरीर संबंध ठेवताना सहमती आवश्यक आहे. पती आहे म्हणून तो त्याच्या पत्नीच्या इच्छेविरोधात शरीर संबंध ठेवेल हे होणं चुकीचं आहे.
सर्वोच्च न्यायालयात काम करणारे वकील विशाल मिश्रा असं म्हणतात की वैवाहिक बलात्कार हा एक संवेदनशील विषय आहे. यावर कायदे तज्ज्ञांनी जास्त विचार करण्याची आणि अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. विवाहानंतर पती पत्नी यांच्या नात्याचा पाया जसा विश्वास आणि प्रेम असतो तसाच शरीर संबंधही असतो. मात्र शरीर संबंध ठेवायचे असतील तर त्यासाठी दोघांचीही परस्पर सहमती आवश्यक आहे. पती पत्नी आहेत म्हणून कोणत्याही परिस्थितीत बळजबरीने शरीर संबंध ठेवले जाणं चुकीचंच आहे. मात्र हा गुन्हा ठरवलं जाणं गैर आहे असंही ते म्हणतात.

सर्वोच्च न्यायालयात काम करणाऱ्या वकील हर्षिता निगम म्हणतात की वैवाहिक बलात्कार हे प्रकरण संवेदनशील आहे. लोकांनी सहमती या शब्दाची व्याख्या योग्य प्रकारे समजून घेतली पाहिजे यासाठी कायद्याचे अभ्यासक आणि सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे लोकांना ही व्याख्या व्यवस्थित समजावून सांगितली पाहिजे. अशी मतं सर्वोच्च न्यायालयातील वकिलांनी मांडली होती. आता चिरैय्या वेबसीरिजमुळे मॅरिटल रेप हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
