पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ फेसबुकवरुन काही वेळासाठी हटवल्याप्रकरणी वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी संसदीय समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीला मेटाचे काही अधिकारीही उपस्थित होते. त्यानंतर संसदीय समितीने ‘मेटा’चे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांना तीन दिवसांचा अल्टीमेटम देत बिनशर्त माफी मागण्यास सांगितलं होतं.

तसेच मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागितली नाही, तर भारतात मेटाला माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत मिळणारे कायदेशीर संरक्षण मागे घेण्याचा इशाराही देण्यात आला होता. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. पंतप्रधान मोदींच्या व्हिडीओवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आणि ‘मेटा’कडून इतर झालेल्या चुकांबद्दल आता मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागितल्याचा दावा सरकारी सूत्रांकडून करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

मेटाकडून त्रुटीची कबुली

पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ हटवल्याच्या प्रकरणासह डीपफेक सामग्री होस्ट करणं, बाल लैंगिक शोषणाच्या सामग्रीसह आदी इतर त्रुटींबद्दल झालेल्या चुकांच्या पार्श्वभूमीवर मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागितली असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी बुधवारी दिली असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. मात्र, याबाबत मेटाकडून अद्याप अधिकृत निवेदन समोर आलेलं नाही.

नेमकं प्रकरण काय?

माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय स्थायी समितीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत गृह मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) आणि मेटासह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांना संबोधित करणारा व्हिडीओ ५ ते ६ तास फेसबुकवर उपलब्ध नव्हता, या मुद्द्यावरून समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. लोकसभेच्या संचालक ए.जोतिर्मयी यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस.कृष्णन यांना पाठवलेल्या पत्रात या घटनेची गंभीर दखल घेण्यात आल्याचं म्हटलं होतं.

संसदीय समितीने काय इशारा दिला होता?

“जर मार्क झुकरबर्ग यांनी हे पत्र मिळाल्यापासून ३ दिवसांच्या आत बिनशर्त माफी मागितली नाही, तर आयटी कायद्याच्या कलम ७९(३) अंतर्गत त्यांना मिळणारी कायदेशीर सवलत काढून घेतली जाईल”, असा इशारा देण्यात आला होता. तसेच याशिवाय, बाल लैंगिक शोषणाशी संबंधित मजकूर आणि महिलांचा अवमान करणाऱ्या सामग्रीवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील या समितीने केली होती. या प्रकरणात आता मार्क झुकरबर्ग यांनी मेटाकडून झालेल्या त्रुटीबाबत माफी मागण्यात आली आहे.