एका तरुणाने त्याच्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत त्याच्याच घरात शरीरसंबंध ठेवताना पकडलं. त्यानंतर या दोघांनी त्याला मारहाण केली. या प्रकरणात या तरुणाने पोलिसांत तक्रारही केली आहे. आता या तरुणाने आरोप केला आहे की माझी पत्नी मला झोपेच्या गोळ्या खाऊ घालते आहे. तिच्या प्रियकराने माझा गळा दाबून माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला असाही आरोप या तरुणाने केला आहे. उत्तर प्रदेशच्या झाशी येथील ही घटना आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

झाशीमधल्या चिरगाव गावातल्या तरुणाचं एका तरुणीशी दीड महिन्यापूर्वी लग्न झालं. ही मुलगी मध्य प्रदेशातील भांडेरची आहे. २४ जून २०२६ ला या दोघांचा विवाह हिंदू पद्धतीने पार पडला. आता या तरुणाने आरोप केला आहे की माझी पत्नी मला चहामधून, दुधातून किंवा अन्नातून झोपेच्या गोळ्या देते आहे. लग्नानंतर दोन ते तीन आठवड्यांनीच हा प्रकार सुरु झाला. मला वारंवार झोपेच्या गोळ्या दिल्या जात असल्याने मी आजारी झालो. माझी रक्त चाचणी केली तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला. यानंतर त्याने महिलेच्या प्रियकराबाबतही तक्रार केली आहे. मी घरात नसताना १९ ऑगस्टच्या दिवशी एक तरुण माझ्या पत्नीला भेटायला आला होता. याबाबत मी पत्नीकडे विचारणा केली तेव्हा तिने नाही असं कुणी आलं नसल्याचं सांगितलं होतं. मात्र तो तिचा प्रियकर होता म्हणून तिने लपवाछपवी केली होती हे मला कळलं असं या तरुणाने पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

२३ ऑगस्टला काय घडलं?

२३ ऑगस्टला हाच तरुण पुन्हा एकदा घरी आला होता असंही या तरुणाने त्याच्या तक्रारीत म्हटलं आहे. तो आला आहे हे कळताच मी तातडीने घरी गेलो. तेव्हा मी या दोघांना शरीर संबंध ठेवताना पकडलं. दोघंही आक्षेपार्ह अवस्थेत होते असंही या तरुणाने तक्रारी नमूद केलं आहे. त्यानंतर या दोघांनी मला ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्या तरुणाने माझा गळा दाबला होता. शेजारी आले आणि मला वाचवलं म्हणून माझा जीव वाचला. तसंच पोलिसांनाही बोलवण्यात आलं म्हणून पुढचा प्रसंग टळला नाहीतर त्या दिवशी माझी हत्या झाली असती असंही या तरुणाने म्हटलं आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. एक महिला आणि एक तरुण हे पलंगावर बसले आहेत आणि त्यांच्याभोवती बरीच गर्दी झाली आहे असा हा व्हिडीओ होता. या प्रकरणात आता पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे.

पत्नीपासून मला आणि माझ्या आई वडिलांना धोका

माझ्या पत्नीपासून मला आणि माझ्या कुटुंबाला धोका आहे असं या तरुणाने तक्रारीत म्हटलं आहे. हा तरुण त्याच्या आई वडिलांसह आला होता. त्याने तिघांच्या वतीने तक्रार नोंदवली आहे. या सगळ्याबाबत पोलिसांनी असं सांगितलं की तक्रार नोंदवल्यानंतर आम्ही या तरुणाच्या घरी गेलो होतो. या तरुणाने जे आरोप केले आहेत त्याची चौकशी करण्यात येते आहे. लवकरच यापुढील कारवाई केली जाईल.