दोन महिन्यांपूर्वीच एका जोडप्याचा विवाह सोहळा पार पडला होता. मात्र या घटनेनंतर अवघ्या दोन महिन्यातच पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरची ही घटना आहे. गजेंद्र नावाच्या तरुणाने त्याच्या २९ वर्षीय पत्नीची म्हणजेच सपनाची रॉडचे वार करुन हत्या केली आहे. सपनाने लग्नापूर्वी धर्म परिवर्तन केलं होतं अशीही माहिती पोलिसांन दिली आहे. या दोघांमध्ये नेमका कसला वाद झाला याची माहिती आता पोलीस घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
सपना आणि गजेंद्र या दोघांचं लग्न दोन महिन्यांपूर्वी झालं. कानपूरमधल्या एका गावात हे दोघं राहात होते. त्यांचा कुठल्याश्या कराणावरुन वाद झाला. खरंतर या दोघांनी प्रेमविवाह केला. पण सपनाचं वागणं पसंत न आल्याने गजेंद्रने तिच्यावर वार केले आणि तिची हत्या केली. त्यानंतर पोलिसांना जाऊन स्वतःच या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरु आहे. सपना आणि गजेंद्र एका भाडे तत्त्वावरच्या घरात राहात होते. गजेंद्र हा गवंडी काम करतो असंही पोलिसांनी सांगितलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी रविवारच्या घटनेबाबत काय माहिती दिली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास सपना ही कुणाशी तरी फोनवर बोलत होती. ती फोनवर बोलतानाच गजेंद्र आणि तिचा पुन्हा एकदा वाद सुरु झाला. त्यानंतर गजेंद्रने रागाच्या भरात लोखंडाचा रॉड उचलला आणि सपनाच्या डोक्यावर वार केले. ज्यानंतर सपना रक्ताच्या थारोळ्यात पडली. एका पाठोपाठ एक वार झाल्याने तिच्या डोक्याला अनेक जखमा झाल्या. गजेंद्रने या घटनेनंतर पोलीस ठाण्यात जात घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत सपनाला रुग्णालयात दाखल केलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक आलोक प्रसाद यांनी काय माहिती दिली?
अतिरिक्त पोलीस अधीक्षक आलोक प्रसाद यांनी सांगितलं की या सपना आणि गजेंद्र या दोघांनी दोन महिन्यांपूर्वी कोर्टात जाऊन लग्न केलं होतं. सपनाने लग्न करण्यापूर्वी हिंदू धर्म स्वीकारला होता. त्यासंदर्भातलं प्रतिज्ञापत्र हे सपनाने लग्नापूर्वी कोर्टात जमा केलं होतं. सपनाचा मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. गजेंद्रला आधी ताब्यात घेण्यात आलं, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
