DSP Kalpna Verma Case: छत्तीसगडचे प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक दीपक टंडन यांनी वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी डीएसपी कल्पना वर्मा यांच्यावर खंडणी, ब्लॅकमेलिंग, फसवणूक आणि भावनिक छळाचे धक्कादायक आरोप केले आहेत. २०१७ च्या बॅचच्या पोलीस अधिकारी असेलल्या डीएसपी कल्पना वर्मा सध्या दंतेवाडा जिल्ह्यात कार्यरत आहेत. आर्थिक वादाचे हे प्रकरण आता वेगळ्याच वळणावर पोहोचले असून यात प्रेम, पैसा, धमकी, व्हायरल व्हॉट्सॲप चॅट्स, बाउन्स झालेले धनादेश आणि एकमेकांवर झालेले आरोप-प्रत्यारोपावर पोहोचले आहे. यामुळे छत्तीसगडच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
डीएसपी कल्पना आणि त्यांची पहिली भेट २०२१ साली झाली. ओळखीचे रूपांतर कालांतराने प्रेमात बदलले. चार वर्षांपासून कल्पना यांनी लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक पिळवणूक केली, असे आरोप दीपक टंडन यांनी केले आहेत. या चार वर्षात कल्पना वर्मा यांनी दोन कोटींची रोकड, १२ लाख रुपयांची हिऱ्याची अंगठी, ५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, १ लाख रुपयांचे ब्रासलेट आणि इनोव्हा क्रिस्टा ही गाडी घेतली, असेही टंडन यांनी सांगितले.
हॉटेल व्यावसायिक टंडन पुढे म्हणाले की, रायपूरच्या व्हीआयपी मार्गावर असलेले त्यांचे एक हॉटेल डीएसपी कल्पना यांनी भावाच्या नावावर बळजबरीने करून घेतले. त्यानंतर ३० लाख रुपये खर्चून हे हॉटेल स्वतःच्या नावावर केले.
डीएसपी कल्पना यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास खोट्या केसेसमध्ये फसविण्याची धमकी दिली होती, असाही आरोप टंडन यांनी केला. हे आरोप करत असताना टंडन यांनी व्हॉट्सॲप चॅट्स, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर डिजिटल रेकॉर्ड पोलीस ठाण्यात पुरावे म्हणून जमा केले. पोलिसांनी दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवले असले तरी या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. हा आर्थिक वाद असून त्याची सखोल चौकशी केली जात आहे, असे उत्तर पोलिसांनी दिले.
डीएसपी कल्पना वर्मा काय म्हणाल्या?
डीएसपी कल्पना वर्मा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून व्यावसायिक दीपक टंडन यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. आर्थिक व्यवहारातून वाद निर्माण झाल्यामुळे गेल्या काही काळापासून आमच्यात वाद आहेत. हे प्रकरण न्यायालयातही पोहोचले होते. न्यायालयीन प्रक्रियेपासून वाचण्यासाठी व्यावसायिक जाणूनबुजून माझे नाव या प्रकरणाशी जोडत आहे, तसेच माझी प्रतिमा मलिन करत आहे, असा प्रतिवाद वर्मा यांनी केला.
सदर आर्थिक वाद माझ्या कामाशी आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित नाही. तरीही माझे फोटो, बिनबुडाची माहिती व्हायरल केली जात आहे. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न होत आहे, असे प्रत्युत्तर डीएसपी कल्पना वर्मा यांनी दिले.
