उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथे एका विवाहितेवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. नराधम आरोपींनी मध्यरात्री घरात घुसून अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित महिलेसह पतीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. 'इंडिया टुडे'नं दिलेल्या वृत्तानुसार, ३० वर्षीय पुरुष आणि त्याच्या २७ वर्षीय पत्नीने गुरुवारी विष प्राशन केलं. या घटनेनंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र गुरुवारीच पतीचा मृत्यू झाला. तर पत्नीचा शुक्रवारी गोरखपूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबतची माहिती बस्तीचे एसपी गोपाल कृष्णा यांनी शनिवारी दिली. हेही वाचा- मुंबईत दोन सावत्र मुलांसह नवऱ्याकडून महिलेवर गँगरेप; तीन महिने सुरू होता अत्याचार, मोबाइलमध्ये आढळले ७०० व्हिडीओ गुरुवारी मध्यरात्री दोन जणांनी घरात घुसून विवाहितेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप जोडप्याच्या नातेवाईकांनी केला आहे. संबंधित जोडप्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला असून त्या व्हिडीओत त्यांनी आरोपींची नावं सांगितली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. मृत व्यक्तीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी पोलिसांनी दोघांविरुद्ध कलम ३७६ डी (सामूहिक बलात्कार) आणि ३०६ (आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे) कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. हेही वाचा- “होय, बलात्कार करण्यासाठी घरात शिरलो, पण…”, मुंबईतील एअर हॉस्टेसच्या हत्येप्रकरणी आरोपीची धक्कादायक कबुली आदर्श (२५) आणि त्रिलोकी (४५) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. मृत जोडप्याला आठ आणि सहा वर्षांची दोन मुलं आणि एक वर्षाची एक मुलगी आहे. जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या वादातून हा सामूहिक बलात्कार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.