मंगळयान मोहीम भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमातील महत्त्वाचा टप्पा असून, यामुळे अधिकाधिक शास्त्रज्ञांना नवनवीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी बळ मिळेल, अशा शब्दांत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंगळवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. मंगळयान मोहिमेला मंगळवारी श्रीहरिकोटा येथून सुरुवात झाली. हे यान घेऊन जाणाऱया प्रक्षेपकाने मंगळवारी दुपारी दोन वाजून ३८ मिनिटांनी उड्डाण केले. त्यानंतर यानाला पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावण्यातही प्रक्षेपक यशस्वी ठरले. यानाला मंगळाच्या कक्षेत पोहोचण्यासाठी ३०० दिवसांचा कालावधी लागणार आहे.
इस्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांना पाठविलेल्या संदेशात ते म्हणाले, मंगळयान मोहीम हा भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. अंतराळ कार्यक्रमात आजचा दिवस मैलाचा दगड म्हणून लक्षात राहील. अंतराळाच्या क्षेत्रात नवनवीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या मोहीमेमुळे शास्त्रज्ञांना बळ मिळणार आहे.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही राधाकृष्णन यांना दूरध्वनी करून त्यांचे आणि इस्रोतील सर्व शास्त्रज्ञांचे मंगळयान मोहीमेबद्दल अभिनंदन केले.