ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारूती सुझुकीने आपल्या ‘बलेनो’ आणि ‘स्विफ्ट डिझायर’ या दोन प्रकाराच्या गाड्या बाजारातून माघारी बोलावल्या आहेत. एअरबॅग कंट्रोलर सॉफ्टवेअर आणि फ्युएल फिल्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे कंपनीने स्वतःहून बलेनोच्या ७५,४१९ आणि स्विफ्ट डिझायरच्या १९६१ गाड्या माघारी बोलावल्या आहेत. ग्राहकांची सुरक्षितता विचारात घेऊन कंपनीने हा निर्णय घेतला.
बलेनोच्या पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारातील ३ ऑगस्ट २०१५ ते १७ मे २०१६ या काळात निर्मिलेल्या गाड्या माघारी बोलावण्यात आल्या आहेत. बलेनो गाडीतील एअरबॅग कंट्रोलर सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचे कंपनीच्या निदर्शनास आल्यावर हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर स्विफ्ट डिझायर गाडीचे फ्युएल फिल्टर सदोष असल्याचे दिसल्यावर याही गाड्या माघारी बोलावण्याचे ठरविण्यात आले. डिझेलवर चालणाऱ्या आणि ऑटे गिअर शिफ्ट असलेल्या स्विफ्ट डिझायर गाड्याच परत बोलावण्यात आलेल्या आहेत. पेट्रोलवर चालणाऱ्या किंवा सर्वसाधारणपणे डिझेलवर चालणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाड्या परत बोलावण्यात आलेल्या नाहीत. त्यामध्ये काहीही दोष नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले.