लखनौ : लखनौसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एनसीआर) सहा जिल्ह्यांत सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर अनिवार्य करण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. याबाबत त्यांनी सोमवारी प्रशासनाला निर्देश दिले.

या जिल्ह्यांत ज्यांनी करोना लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण केल्या नाहीत, त्यांचा शोध घ्यावा, तसेच त्यांचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करावे. त्याचप्रमाणे ज्यांना करोनाची लक्षणे दिसत आहेत, त्यांच्या चाचण्या कराव्यात, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.  

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, येत्या काही काळात करोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पण त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासण्याची किंवा त्यांची प्रकृती गंभीर होण्याची शक्यता कमी आहे.

राज्यालगतच्या काही राज्यांत करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार लखनौसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गौतम बुद्धनगर, गाझियाबाद, हापूर, मीरत, बुलंदशहर, बागपत जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर बंधनकारक आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या चोवीस तासांत गौतम बुद्धनगरमध्ये ६५, गाझियाबादमध्ये २० आणि लखनौमध्ये १० याप्रमाणे करोनाचे नवे रुग्ण नोंदले गेले आहेत. करोना स्थितीत सुधारणा झाल्याने उत्तर प्रदेश सरकारने या महिन्याच्या आरंभीच मुखपट्टी वापराचे बंधन शिथिल केले होते.