भारताची तीव्र नाराजी; दहशतवादविरोधाला हरताळ
जैश-ए -मोहम्मदचा प्रमुख व पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझर याचे नाव र्निबध यादीत समाविष्ट करण्यास चीनने संयुक्त राष्ट्रात केलेला विरोध अनाकलनीय आहे, अशा शब्दांत भारताने नाराजी व्यक्त केली आहे.
चीनने अझरला काळ्या यादीत टाकण्याच्या प्रस्तावावर नकाराधिकाराचा वापर केला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाविरोधात एकजूट करण्याच्या तत्त्वाला चीनने या निर्णयाद्वारे हरताळ फासल्याचे भारताने म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या र्निबध समितीने दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या उपाययोजनांत पक्षपाती भूमिका घेतली आहे. संयुक्त राष्ट्रांनी तांत्रिक कारणे दाखवून अझरचे नाव र्निबध यादीत घातले नाही याबाबत भारत नाराज आहे. जैश- ए- मोहम्मद या पाकिस्तानी संघटनेला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषद समितीने २००१ मध्ये काळ्या यादीत टाकले असताना मसूद अझरवर र्निबध लादण्यास काहीच हरकत नव्हती. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने सदस्य देशांचे व त्यांच्या नागरिकांचे जैश -ए -मोहम्मद संघटना व मसूद अझर यांच्यापासून रक्षण करणे गरजेचे होते, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त विकास स्वरूप यांनी नाराजी व्यक्त केली.
चीनचे संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी लिउ लेयी यांनी मात्र वेगळा सूर लावला. अझरवर दहशतवादी म्हणून बंदी घालता येणार नाही. कारण ज्या अटींवर सुरक्षा परिषद एखाद्या व्यक्तीला दहशतवादी जाहीर करते त्या निकषांचे पालन होत नाही. कुणाला र्निबध यादीत टाकताना निकषांचा विचार करावा लागतो व त्यांची पूर्तता होते की नाही हे पाहण्याचे काम सदस्य देशांचे असते, असे लेयी म्हणाले.