दिल्लीमध्ये नुकताच सामूहिक धर्मांतर सोहळा पार पडला. या कार्यक्रमात ‘हिंदू देव-देवतांची पूजा न करण्याची’ शपथ घेण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे, आम आदमी पक्षाचे मंत्री राजेंद्र पाल गौतम या कार्यक्रमाला उपस्थित होते. ५ ऑक्टोबरला आंबेडकर भवन येथे बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या सहभागी होण्यासाठी १० हजाराहून अधिक लोक उपस्थित होते.
या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल झाला असून राजेंद्र पाल गौतम आणि इतर उपस्थित शपथ घेताना दिसत आहेत. “ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यावर माझी श्रद्धा नाही, मी त्यांची पूजाही करणार नाही. देवाचा अवतार मानला जाणारे प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावरही माझी श्रद्धा नाही आणि त्यांचीही पूजा करणार नाही,” अशी शपथ यावेळी घेण्यात आली.
राजेंद्र पाल यांनी ट्विटरला कार्यक्रमातील व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ‘ते बुद्धाकडे चला, मिशन जय भीम’ आपल्याला बोलावत असल्याचं म्हणत आहेत.
भाजपाची टीका
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाने टीका केली असून, भारताची विभागणी करण्याचा हा प्रोजेक्ट असल्याचा आरोप केला आहे. अमित मालविया यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की “अरविंद केजरीवाल यांचे मंत्री राजेंद्र पाल ‘ब्रेकिंग इंडिया’ प्रोजेक्ट राबवत आहेत. अरविंद केजरीवाल या हिंदूविरोधी प्रचाराचे प्रमुख प्रायोजक आहेत”.
“हा हिंदू आणि बौद्ध धर्माचा अपमान आहे. आपचे मंत्री दंगल भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. मंत्र्यांना तात्काळ पक्षातून काढलं पाहिजे. आम्ही त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करत आहोत,” असं मनोज तिवारी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
“माझा बौद्ध धर्मावर विश्वास”
कार्यक्रमामुळे वाद निर्माण झाल्यानंतर राजेंद्र पाल गौतम यांनी स्पष्टीकरण दिलं असून भाजपा राष्ट्रविरोधी असल्याची टीका केली आहे. “आपला बौद्ध धर्मावर विश्वास असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. एखाद्याच्या श्रद्धेवर कोणाला आक्षेप का? त्यांना तक्रार करु दे. घटनेने आपल्या कोणत्याही धर्माचं पालन करण्याचा अधिकार दिली आहे. भाजपाला आपची भीती वाटत आहे. ते फक्त आमच्याविरोधात खोट्या तक्रारी देऊ शकतात,” असं ते म्हणाले आहेत.