चीनमध्ये काही बँकांकडे रोख रक्कम नसल्याने संकट निर्माण झालं आहे. या बँकाबाहेर ठेवीदारांनी रांगा लावल्या असून आपले बचत खात्यातील पैसे परत करावेत अशी मागणी केली जात आहे. रविवारी अशाच प्रकारे शांततापूर्ण आंदोलन सुरु असताना आंदोलकांवर चिनी प्रशासनाकडून हिंसक पद्धतीने कारवाई करण्यात आली. यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले. काहींना अटक करुन नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

एप्रिल महिन्यापासून चीनच्या मध्य हेनान प्रांतातील चार ग्रामीण बँकांनी लाखो डॉलर्सच्या ठेवी गोठवल्या आहेत. यामुळे आधीच लॉकडानमुळे मोठा आर्थिक सहन करावा लागलेल्या लाखो लोकांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं असून दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. संतापलेल्या ठेवीदारांनी गेल्या दोन महिन्यात हेनान प्रांताची राजधानी झेंगझोऊ शहरात अनेक निदर्शने केली आहेत. पण अद्यापही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे.

सीएनएनच्या वृत्तानुसार, रविवारी देशभरातील एक हजाराहून जास्त ठेवीदार देशाची मध्यवर्ती बँक ‘पिपल्स बँक ऑफ चीन’च्या झेंगझोऊ शाखेबाहेर एकत्र आले होते. यावेळी मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात आली होती.

प्रवासावर निर्बंध असतानाही करोनाची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंतचं हे चीनमधील सर्वात मोठं आंदोलन होतं. गेल्या महिन्यात, झेंगझोऊमधील अधिकाऱ्यांनी ठेवीदारांच्या हालचालींवर निर्बंध आणण्यासाठी, तसंच त्यांचं आंदोलन दडपण्यासाठी देशाच्या डिजिटल कोविड हेल्थ-कोड सिस्टीममध्ये छेडछाड केली होती. ज्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती.

मात्र यावेळी सर्व आंदोलक बँकेच्या बाहेर जमा झाले होते. अधिकाऱ्यांकडून अडवणूक होऊ नये यासाठी अनेकजण पहाटे ४ वाजताच पोहोचले होते. यामध्ये लहान मुलं तसंच ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता. आंदोलन करत यावेळी घोषणा देण्यात आल्या. ‘आमचे पैसे परत द्या’ अशा घोषणा आंदोलकांकडून देण्यात आल्या.

अनेकांनी हातामध्ये चीनचा झेंडा पकडलेला होता. आपली देशभक्ती दाखवण्यासाठी रणनीतीचा भाग म्हणून अनेकदा आंदोलक हातात झेंडा घेऊन उतरलेले असतात. आपली तक्रार स्थानिक सरकारच्या विरोधात असून ती सोडवण्यासाठी केंद्र सरकारला पाठिंबा असून, त्यावर अवलंबून असल्याचं दाखवण्याचा हा प्रयत्न असतो.

आंदोलन सुरु असताना मोठ्या प्रमाणात पोलीस आणि सुरक्षारक्षक तिथे साध्या कपड्यांमध्ये पोहोचले होते. यानंतर सुरक्षारक्षक अचानक पायऱ्यावंर चढले आणि आंदोलकांसोबत झटापट सुरु झाली. आंदोलकांनी त्यांच्यावर बाटल्या आणि इतर लहान वस्तू फेकल्या.

यानंतर काही वेळातच तिथे गोंधळ आणि धावपळ सुरु झाली. सुरक्षा अधिकाऱ्यांनी काही आंदोलकांना ओढत नेलं आणि विरोध करणाऱ्यांना मारहाण केली. तिथे उपस्थित काही लोकांच्या माहितीनुसार, यामध्ये महिला आणि वयस्कर नागरिकांचाही समावेश होता. सुरक्षा यंत्रणांनी अचानक हिंसकपणे केलेल्या कारवाईमुळे धक्का बसल्याचं अनेकांनी सांगितलं आहे.

मोठ्या प्रमाणात आंदोलकांवर कारवाई करत त्यांना बसमधून चौकशीसाठी नेण्यात आलं. यामध्ये हॉटेल्स, शाळा, कारखाने होते असं कारवाई करण्यात आलेल्यांचं म्हणणं आहे. काही जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं. अटक केलेल्या अनेकांना दुपारपर्यंत सोडण्यात आले, अशी माहिती लोकांनी दिली.

सीएनएने यासंबंधी पोलिसांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला. दरम्यान रविवारी रात्री उशिरा हेनाने बँकिंग नियामकाकडून परिपत्रक जारी करत माहिती देण्यात आली. यामध्ये त्यांनी संबंधित विगा जलदगतीने चारही ग्रामीण बँकांमधील ठेवीदारांच्या निधीची पडताळणी करत असल्याचं सांगितलं.

दरम्यान Xuchang शहरातील पोलिसांनी रविवारी उशिरा एक निवेदन प्रसिद्ध केलं. त्यात देण्यात आलेल्या माहितीनुसार, त्यांनी अलीकडेच एका कथित “गुन्हेगार टोळी” च्या सदस्यांना अटक केली आहे, ज्यांच्यावर २०११ पासून हेनान ग्रामीण बँकांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवल्याचा आरोप आहे. त्यांनी शेअरहोल्डिंग आणि बँकांच्या अधिकार्‍यांशी हेराफेरी करत फायदा घेतला असा त्यांचा दावा आहे.

संशयितांवर काल्पनिक कर्जाच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे निधी हस्तांतरित केल्याचाही आरोप होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा काही निधी आणि मालमत्ता जप्त करून गोठवण्यात आल्या आहेत.