China Defense Corruption News: चीनच्या लष्करात भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. देशाच्या अणुबॉम्ब कार्यक्रमाची माहिती अमेरिकेला दिल्याच्या आरोपाखाली बड्या अधिकाऱ्याची हकालपट्टी केल्यानंतर, आता अण्वस्त्रात इंधनाऐवजी पाणी भरुन ठेवल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. लष्करात उफाळलेल्या भ्रष्टाचारामुळे चिनी लष्करातील अधिकाऱ्यांचा प्रामाणिकपणा, देशनिष्ठा आणि युद्धाची तयारी यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अणुबॉम्ब कार्यक्रमाची माहिती अमेरिकेला दिल्याचा आरोप

देशाच्या अणुबॉम्ब कार्यक्रमाची माहिती अमेरिकेला दिल्याच्या आरोपाखाली जनरल झांग यूक्सिया आणि लष्करी नेते लिऊ झेनली यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यूक्सिया राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या जवळचे अधिकारी मानले जातात. तसेच, यूक्सिया आणि झेनली पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (PLA) अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या केंद्रीय लष्करी आयोगाचे (CMC) सदस्य मानले जातात. दोन्ही अधिकाऱ्यांची सध्या कसून चौकशी केली जात आहे.

अण्वस्त्रात भरुन ठेवलं पाणी

अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने २०२४ मध्ये केलेल्या मूल्यांकनात पीपल्स लिबरेशन आर्मीत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे आढळून आले होते. अनेक अण्वस्त्र सदोष असल्याचे उघडकीस आले. क्षेपणास्त्र लॉन्च होऊच नये म्हणून विविध गोष्टी करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. चीनच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या असणाऱ्या अण्वस्त्रात इंधनाऐवजी चक्क पाणी भरुन ठेवल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आल्याचे गुप्तचर विभागाच्या मूल्यांकनातून समोर आले होते, असे वृत्त ब्लूमबर्गने प्रसिद्ध केले आहे.

भ्रष्टाचार हटाव मोहीम

पीपल्स लिबरेशन आर्मीतील भ्रष्टाचारामुळे राष्ट्राध्यक्ष शी जिगपिंग यांनाही मोठा धक्का बसला आहे. भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर लष्करात होऊ घातलेल्या सुधारणा सध्या स्थगित केल्या आहेत, असे ब्लूमबर्गमध्ये म्हटले आहे. २०१३ पासूनच शी जिगपिंग यांनी लष्करातून भ्रष्टाचार हद्दपार करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत अनेक बड्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी देखील करण्यात आली आहे. लष्करी अधिकारी यूक्सिया आणि झेनली यांच्याबाबत समोर आलेली माहिती धक्कादायक असल्याने याचा सध्या सखोल तपास केला जात आहे.

२०२७ मध्ये तैवानवर हल्ल्याची शक्यता

लष्करातील भ्रष्टाचारामुळे धक्का बसलेल्या शी यांनी शिस्तीबाबत कोणतीही तडजोड करण्यास नकार दिला आहे. बड्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. दरम्यान, लष्करात अत्याधुनिक सुधारणा करण्यास शी आग्रही आहेत. टेलीग्राफमध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, २०२७ मध्ये चीन तैवानवर हल्ला करण्याची दाट शक्यता आहे. तसेच, २०४९ पर्यंत अमेरिकेपेक्षा ताकदवान लष्कर होण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

लष्करी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

राष्ट्राध्यक्ष शी यांनी गेल्या काही दिवसांत भ्रष्ट्राचारविरोधात कडक कारवाई करत नऊ बड्या अधिकाऱ्यांनी घरचा रस्ता दाखवला आहे. यामुळे लष्करी अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार अजिबात सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. दरम्यान, अण्वस्त्रात भरलेलं पाणा, अकार्यक्षम क्षेपणास्त्रे आणि सदोष पायाभूत सुविधा यामुळे चीनच्या लष्करी सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.