आसामच्या तिनसुकिया या ठिकाणी असलेल्या ऑइल इंडिया गॅसच्या विहिरीला भीषण आग लागली आहे. या आगीचे लोळ आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरले आहेत. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांनी चर्चा केली. त्यांनी या घटनेत काय काय नुकसान झालं आहे ते जाणून घेतलं. तसेच या ठिकाणी मदत आणि बचाव कार्यासाठी NDRF चं पथकही तैनात करण्यात आलं आहे. आसाम सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

आज दुपारच्या सुमारास ही आग लागली. ही आग हळूहळू पसरु लागली आहे. मागच्या १४ दिवसांपासून या विहिरीत गॅस गळती होत होती. त्यामुळेच ही आग लागल्याचं सांगण्यात येतं आहे. एनडीआरएफची टीम मदत आणि बचाव कार्य करत असल्याचं आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी स्पष्ट केलं. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

ही आग नियंत्रणात आणण्यासाठी सिंगापूरहून तज्ज्ञांना बोलवण्यात आलं आहे. गॅसची ही विहीर आसामची राजधाी गुवाहाटी पासून ५०० किमी अंतरावर आहे. भारताच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर आग लागण्याची ही सर्वात भीषण घटना आहे अस प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे