North Macedonia Nightclub Fire : युरोपातील उत्तर मॅसिडोनियामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील कोकानी शहरातील एका नाइट क्लबमध्ये शनिवारी भीषण आग लागली. या आगीत ५१ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या आगीत १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आसपासच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार चालू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल त्वरित घटनास्थळी दाखल झालं. मात्र आग इतकी भीषण होती की काही मिनिटात ५० हून अधिक लोक होरपळून मरण पावले.

या घटनेत १०० हून अधिक जण जखमी आहेत. या जखमींपैकी अनेकांची स्थिती नाजूक असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर गृहमंत्री पांसे तोशकोवस्की यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्यांनी मृत व जखमींची आकडेवारी, तसेच त्यांच्यावरील उपचारांची माहिती दिली.

एक संशयित पोलिसांच्या ताब्यात

तोशकोवस्की म्हणाले, “रात्री २.२५ च्या सुमारास स्थानिक पॉप म्युझिक कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. नाइट क्लबमध्ये आलेल्या काही तरुणांनी फटाक्यांची आतषबाजी केली. यामुळेच ही आग लागली. जखमींचे पालक व नातेवाइक रुग्णालयांमध्ये, कोकानी येथील शासकीय कार्यालयात एकत्र जमले असून त्यांनी अधिकाऱ्यांकडे या घटनेची अधिक माहिती मागितली आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला अटक केल्याचं तोशकोवस्की यांनी सांगितलं. मात्र, त्यांनी याप्रकरणी सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.

अवघी ३०,००० इतकी लोकसंख्या असलेल्या या शहरातील नाइट क्लबमध्ये प्रसिद्ध हिप-हॉप जोडी एडीएनचा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कॉन्सर्टसाठी जवळपास १,५०० लोक जमले होते. कार्यक्रम चालू असताना काही तरुणांनी फटाक्यांची आतषबाजी केली. त्यामुळे आग लागली. त्यानंतर मोठा गोंधळ उडाला, लोकांची धावपळ सुरू झाली. या घटनेत ५० जण मृत्यूमुखी पडले आहेत. त्यापैकी काहीजण होरपळून मरण पावले आहेत. तर, काही जण चेंगराचेंगरीत चिरडले गेले आहेत.