Submarine attack on Iranian ship off Sri Lanka: इराणचा अमेरिका आणि इस्त्रालयविरुद्धचा संघर्ष तीव्र झाला असताना हिंदी महासागरात श्रीलंकेजवळ एक भीषण घटना घडली आहे. श्रीलंकेजवळ इराणी युद्धनौकेवर अमेरिकन पाणबुडीने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेत ८० जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. १८० जणांपैकी अनेकजण अद्याप बेपत्ता असून, जखमींना उपचारासाठी श्रीलंकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे वृत्त रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे. 

श्रीलंकचे नौदल, लष्कर धावले मदतीला

इराणी जहाजावर हल्ला झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर श्रीलंकेचे नौदल मदतीला धावले. श्रीलंकेच्या नौदल आणि लष्कराने या दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून, बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे.

श्रीलंकेच्या नौदलाने काय माहिती दिली?

आम्ही ७९ लोकांचा वाचवले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. जहाज बुडाले असून, १०१ जण बेपत्ता असल्याचे समजते, अशी माहिती श्रीलंकेच्या नौदलाने रॉयटर्सला दिली आहे. दरम्यान, एकाचा मृत्यू झाल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हल्ला कोणी केला?

हिंदी महासागरात असलेल्या इराणच्या या जहाजावर हल्ला कोणी केला याची मात्र, अद्याप माहिती समोर आलेली नाही. पाणबुडीतून झालेला हल्ला कोणाच्या आदेशाने झाला? याबाबत माहिती मिळाली नसल्याचे वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, अमेरिका – इस्त्रायल इराणवर हल्ले करत असताना हिंदी महासागरातील या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.