Maulana Jarjis Ansari controversial statement: भगवान कृष्ण यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेल्या मुस्लिम मौलवीचा जुना एक व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. मौलवीच्या या व्हिडीओवरुन नव्या वादाला तोंड फुटले असून, हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. मौलाना जरजीस अन्सारी असे मौलवीचे नाव आहे. अन्सारी विरोधात प्रक्षोभक वक्तव्य करुन धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी लखनऊमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका हिंदू साधूने मौलवीची जीभ कापून टाकणाऱ्यास १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तर, मुस्लिम धर्मगुरुंनी अन्सारीने माफी मागावी अशी मागणी केली आहे.

जुना व्हिडीओ व्हायरल

मौलाना जरजीस अन्सारी उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती असून, झारखंडमधील एका कार्यक्रमात बोलताना भगवान कृष्णाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. “भगवान कृष्ण एक मुस्लिम होते आणि ते दिवसातून पाच वेळा नमाज अदा करायचे”, असे वक्तव्य अन्सारीने केले होते.

व्हिडीओ वादाच्या भोवऱ्यात

समोर आलेल्या व्हिडीओत अन्सारी यासाठी भगवद्गीतेच्या अध्याय ६, श्लोक १० चा संदर्भ देतायत. मौलाना अन्सारीचा हा जुना व्हिडीओ असून, पुन्हा एकदा व्हायरल झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अन्सारीच्या व्हिडीओवरुन हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत.

गुन्हा नोंद

लखनऊमधील हजरतगंज पोलिस ठाण्यात अन्सारीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर, हिंदू साधू महामंडलेश्वर विष्णू दास यांनी या वक्तव्याचा निषेध करत मौलवीची जीभ कापून टाकणाऱ्यास १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. मौलवीने हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. त्याला संस्कृतमधील एक शब्द देखील माहिती नाही त्याने भगवद्गीतेच्या श्लोक देखील चुकीच्या पद्धतीने समजावून सांगितल्याचा आरोप दास यांनी केला.

साधू आक्रमक

तपस्वी पीठाधीश्वर, जगद्गुरू परमहंस आचार्य यांनी देखील जरजीसचे वक्तव्य निराधार असल्याचे म्हणत टीका केली.

मौलाना साजिद रशीदी काय म्हणाले?

मौलाना जरजिस अन्सारीच्या वक्तव्याचा ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना साजिद रशीदी यांनी देखील निषेध केला. अन्सारीचे वक्तव्य चुकीचे आहे. कोणीही इतरांच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, असे रशीदी म्हणाले.

नक्वी यांच्याकडून निषेध

शिया धर्मगुरू सय्यद सैफ अब्बास नक्वी यांनी देखील अन्सारीचे वक्तव्य दुर्दैवी आणि निंदनीय असल्याचे म्हटले. “तुम्ही कोणाच्या तरी धार्मिक श्रद्धा आणि विश्वासांना दुखावत आहात. तुम्ही योगाची तुलना नमाजशी करत आहात”, असे नक्वी म्हणाले.

जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाल्यानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून, आता मुस्लिम संघटना देखील मौलवींनी वक्तव्य मागे घेऊन माफी मागण्याची मागणी करत आहेत.