आम जनता उन्नयन पार्टीचे अध्यक्ष नाओदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हुमायूँ कबीर यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हुमायूँ कबीर म्हणाले की मी अल्लाकडे दुवा करतो की सुवेंदु अधिकारी यांचा लवकर मृत्यू होवो. मी शुक्रवारी नमाज पठण करेन आणि अल्लाकडे दुवा मागेन की सुवेंदु अधिकारी यांचं तिकिट लवकरात लवकर नक्की करावं. त्यांच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी यू टर्न घेतला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
हुमायूँ अकबर यांना विचारण्यात आलं होतं की काही महिन्यांपूर्वी शरद पवारांचे पुतणे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू अकस्मात कसा काय झाला? त्यावर हुमायूँ अकबर म्हणाले काँग्रेसचे छत्तीसगढचे एक मुख्यमंत्री होते त्यांचा मृत्यू कसा झाला? माधवराव सिंधियांचा मृत्यू कसा झाला? इंदिरा गांधी यांची हत्या कशी झाली? राजीव गांधींची हत्या कशी करण्यात आली? सगळं काही अल्लाच्या हाती आहे. तसंच मी तुम्हाला आज हे सांगू इच्छितो की सुवेंदु अधिकारी यांना खूप अहंकार आहे. मी शुक्रवारी जे नमाज पठण करेन तेव्हा मी अल्लाकडे दुवा मागेन की त्यांनाही लवकरात लवकर वर बोलवावं. हुमायूँ कबीर म्हणाले पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांना खूप अहंकार आहे. पण त्यांचाही मृत्यू होणार आहे. त्यांनाही या जगातून जावं लागणार आहे. हे त्यांनी लक्षात घेतलं नाही तर अशा लोकांना अल्ला धडा शिकवतो आणि शिक्षा देतो असंही हुमायूँ कबीर यांनी म्हटलं आहे. एनडीटीव्ही ने हे वृत्त दिलं आहे.
अवघ्या काही तासांत हुमायूँ कबीर यांचा यू टर्न
कबीर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला. भाजपाने त्यांच्यावर जोरदार टीका केली. तसंच सोशल मीडियावरही त्यांच्यावर टीका झाली. त्यानंतर हुमायूँ कबीर यांनी यू टर्न घेतला. ते म्हणाले मी आता शुक्रवारी जे नमाज पठण करेन त्यात सुवेंदु अधिकारी यांच्या दीर्घ आयुष्यासाठी दुवा माग हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. तसंच सुवेंदु अधिकारी हे उद्या देशाचे पंतप्रधान होवोत अशीही दुवा मागेन असं म्हणत आपल्या वक्तव्यापासून यू टर्न घेतला. बंगालचे एक मंत्री शंकर घोष म्हणाले की हुमायूँ कबीर यांनी सुरुवातीला जे विधान केलं त्या विधानाला महत्त्व देण्याची गरज नाही. कारण अशा पद्धतीने राजकीय वक्तव्य केलं जात नाही.
