दिल्लीमध्ये विप्रो या आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साडेपाच वर्षे काम केल्यानंतर या महिलेला कामावरुन कमी करण्यात आलं. आपल्याला आलेला हा अनुभव विचित्र आणि तेवढाच कठीण होता कारण असं काही माझ्या बाबतीत घडेल हे मला मुळीच वाटलं नव्हतं असं या महिलेने म्हटलं आहे. पण तिने या संदर्भातला जो व्हिडीओ पोस्ट केला आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनुक्रिती विद्यार्थी असं या महिलेचं नाव आहे तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
अनुक्रितीने पोस्ट केलेला व्हिडीओ व्हायरल
अनुक्रिती विद्यार्थी ही महिला Wipro AI Solutions मध्ये मार्केटिंग विभागात काम करत होती. तिला २९ जून रोजी एचआरने बोलावलं आणि कामावरुन कमी करत असल्याचं सांगत घरी जायला सांगितलं. साडेपाच वर्षे ज्या कंपनीत काम केलं त्या ठिकाणी असं काहीतरी घडेल हे याची तिला कल्पना नव्हती. या घटनेनंतर अर्थातच तिला वाईट वाटलं. पण नंर तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मला कामावरुन कमी करण्यात आलं कदाचित ही देवाची मर्जी आहे, मी काहीतरी चांगलं केलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे म्हणूनच हे घडलं असावं या आशयाचा एक व्हिडीओ अनुक्रिती या महिलेने पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
अनुक्रितीने काय म्हटलं आहे?
मी आता जॉबलेस आहे, २९ जूनला मला एचआरने बोलवलं. तिथे माझे मॅनेजरही होते. त्यांनी मला सांगितलं की कंपनीतलं तुझं काम संपलं. त्यानंतर त्यांनी मला कंपनी म्हणजेच माझं ऑफिस सोडायला सांगितलं. मला ती कंपनी सोडायला सांगितली जिथे मी साडेपाच वर्षे काम केलं. पुढे काय करायचं? याबाबत माझ्याकडे काही उत्तर आत्ता तरी नाही. कदाचित मला आणखी एखादा असाच कॉर्पोरेट जॉब मिळेलही. मला माहीत नाही की पुढे काय होणार आहे. पण मला वाटतंय की ही देवाची मर्जी आहे, मी पुढे जावं म्हणूनच हे घडलं आहे. कदाचित मी स्वतःचं काहीतरी सुरु करेन. मला सध्या काहीच कल्पना नाही, माझ्यावर कधी अशी वेळ येईल असं वाटलं नव्हतं. पण आता ही वेळ माझ्यावर आली आहे असं या महिलेने म्हटलं आहे. मला आता दर महिन्याला मिळणारा पगार मिळणार नाही हे मला माहीत आहे. आर्थिक स्थैर्य होतं ते गेलं आहे. कदाचित मी या नोकरीपेक्षा कमीही पैसे कमवू शकते, कदाचित जास्तही. मला आत्ता काहीही ठाऊक नाही.
नेटकरी काय म्हणत आहेत?
अनुक्रितीच्या व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युझर म्हणतो, ले ऑफ हे आता कॉमन झालंय. नोकरी जाणं ही काही मोठी गोष्ट नाही. दुसरी नोकरी शोध तुला मिळेल. एका युजरने म्हटलंय यालाच कॉर्पोरेट कल्चर म्हणतात. पण काळजी करु नकोस सगळं नीट होईल. काहींनी असं म्हटलं आहे की तू तुझा व्यवसाय सुरु कर. काहींनी आपणही नोकरी गेल्यावर कशी नवी सुरुवात केली आणि कसे यशस्वी झालो असंही तिला सांगितलं आहे
