पाकिस्तान भारताच्या कुरापती काढणे सोडत नाही. पाकिस्तानकडून सुधारण्याची अपेक्षा ठेवणं साफ चुकीचं आहे. पाकिस्तानला सुधारायचं असेल तर त्याला किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. एका सर्जिकल स्ट्राइकने त्यांना अक्कल आली असे दिसत नाही असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणखी एका सर्जिकल स्ट्राइकचे संकेत दिले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे संकेत दिले आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्रमक होत पाकिस्तानला ठणकावले आहे. पाकिस्तानच्या कुरापती थांबल्या नाहीत, दहशतवादी हल्ले थांबले नाहीत तर आम्हाला आणखी एक सर्जिकल स्ट्राइक करावाच लागेल असे संकेत मोदींनी दिले आहेत.

एकीकडे पाकिस्तानची चर्चेची भाषा होते आणि दुसरीकडे भारतावर दहशतवादी हल्ले होतात. पाकिस्तानकडून सुधारण्याची अपेक्षा ठेवणं हे चुकीचं ठरेल त्यांना एका लढाईने अक्कल आली असे अजिबात वाटत नाही असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

भारताने जेव्हा पाकिस्तानविरोधात सर्जिकल स्ट्राइक केला तेव्हा देशभरातून या निर्णयाचे कौतुक झाले. तर काँग्रेसने या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागितले त्यामुळे काँग्रेसवर टीकाही झाली होती. सर्जिकल स्ट्राइकचे काही व्हिडिओही सरकारने जारी केले होते. आता पाकिस्तानच्या कारवाया थांबवायच्या असतील तर अशाच सर्जिकल स्ट्राइकची गरज असल्याचे संकेत नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मुलाखतीतून दिले आहेत.