बसपाच्या नेत्या मायावती यांनी इच्छुकांकडून पैसे घेऊन लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाची उमेदवारी दिल्याचा आरोप पक्षाचे माजी समन्वयक जुगलकिशोर यांनी केल्याने खळबळ माजली आहे. मात्र बसपाने या आरोपाचे खंडन केले असून जुगलकिशोर यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे सूचित केले आहे. विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्यसभा खासदार जुगलकिशोर यांच्या पुत्राला उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी हा आरोप केल्याचे बसपाचे राष्ट्रीय सचिव स्वामीप्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे.
लखीमपूर (राखीव) विधानसभा मतदारसंघातून आपल्या पुत्राला मायावती यांनी उमेदवारी नाकारल्याची माहिती मिळाल्यापासून जुगलकिशोर यांनी हास्यास्पद आरोप करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे, असे मौर्य म्हणाले. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत जुगलकिशोर यांच्यामुळे राज्याच्या पूर्वेकडील भागांत पक्षाला मोठा फटका बसल्याचा आरोप मौर्य यांनी केला.