उत्तर प्रदेशात सध्या सुरू असलेल्या जातीय हिंसाचाराचे मूळ भारतीय जनता पक्ष आणि राज्यातील सत्ताधारी समाजवादी पक्ष यांच्या परस्परांशी असलेल्या साटेलोटय़ात आहे, असा आरोप बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केला. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशातील स्थिती खालावलीच होती, मात्र केंद्रात भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आल्यानंतर ती आणखीच बिकट झाली, असा दावाही मायावतींनी केला.
देशात जातीयवादी पक्षांना बळकटी मिळू लागली आहे. अनेक राज्यांमध्ये धार्मिक िहसाचाराच्या दुर्घटना होत आहेत आणि उत्तर प्रदेश त्यात आघाडीवरील राज्य आहे. राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे साटेलोटेच याला जबाबदार आहे. समाजवादी पक्षाच्या हाती सत्ता गेल्यानंतर उत्तर प्रदेशातील शांतताच हरवली. मात्र केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर परिस्थिती आणखीनच चिघळली, असा आरोप मायावती यांनी पत्रकारांशी बोलताना केला. देशातील सांप्रदायिक हिंसाचार बंद व्हावा यासाठी केंद्राने कठोर पावले उचलायला हवीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून केलेले पहिले भाषण कसे वाटले, या प्रश्नाचे उत्तर देताना आगामी चार राज्यांमधील विधानसभा निवडणुका लक्षात घेत त्यांनी केलेले हे प्रचाराचेच भाषण होते, अशी टीका मायावतींनी केली.
विधानसभा स्वबळावरच लढणार
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खातेही उघडू न शकलेल्या बहुजन समाज पक्षाने हरयाणा आणि महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषत:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र लढण्याची तयारी दर्शविलेली असतानाही मायावती यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चार राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये बसपा स्वबळावरच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.