भाजपच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीला कोणत्याही स्थितीत पाठिंबा देणार नसल्याचे बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मतमोजणीनंतर आपण ममता बॅनर्जी, जयललिता आणि मायावती यांच्यासोबत आघाडी करण्यास तयार आहोत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत, असे म्हटले होते. त्यानंतर मायावती यांनी लगेचच पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली.
मतमोजणीनंतर बहुमत मिळणार नसल्याचे भाजपच्या नेत्यांच्या लक्षात आले आहे आणि माध्यमे सांगताहेत तशी कोणतीही मोदींची लाट नसल्याचे मायावती यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, निवडणुकीच्या सुरुवातीला एनडीएला बाहेरच्या पाठिंब्याची गरज पडणार नाही, असे मोदींनी म्हटले होते. विजयाबद्दल खात्री नसल्याशिवाय कोणताही पक्ष इतरांचा पाठिंबा घेण्याचा विचार करीत नाही. आमच्या पक्षाला मतदान करणाऱय़ा अल्पसंख्याक समाजामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण करण्यासाठीच मोदींनी जाणीवपूर्वक तसे वक्तव्य केले आहे.
भाजपने नेहमी बहुजन समाज पक्षाची वाटचाल रोखण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही मायावती यांनी केला.