Murder in MP Indore : वाढदिवसाच्या पार्टीला जाते सांगून घरातून निघून गेलेली २४ वर्षीय तरुणी चार दिवस घरीच परतली नाही. तिच्या आई-वडिलांनी प्रचंड शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर चार दिवसांनंतर या तरुणीचा मृतदेह तिच्या मित्राच्या भाड्याच्या खोलीत सापडला आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथे हा प्रकार घडला असून इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
तरुणीच्या मोज्यांवरून पटवली ओळख
१० फेब्रुवारी रोजी संबंधित तरुणीला तिच्या वडिलांनी जन्म प्रमाणपत्र दुरुस्ती करता जिल्हाधिकारी कार्यालयात सोडलं. इथलं काम संपलं की ती एका मित्राच्या वाढदिवसाला जाणार आहे, तिथून लवकरच घरी परत येईल, असं तिने वडिलांना सांगितलं. मात्र, त्यानंतर ती घरी परतलीच नाही.चार दिवसांनी इंदूरमधील तिच्या वर्गमित्राच्या भाड्याच्या खोलीत तिचा मृतदेह सापडला. तिचा मृतदेह इतका कुजलेला होता की तिच्या वडिलांना फक्त तिने घातलेल्या मोज्यांवरूनच तिची ओळख पटवावी लागली.
मित्राविरोधात गुन्हा दाखल
तिचा वर्गमित्र पियुष धामनोडियाने इंदूरमध्ये घर भाड्याने घेतलं होतं. तोच या प्रकरणाची मुख्य संशयित आरोपी असल्याचा पोलिसांना संशय आला. कॉलेजच्या ग्रुपवर एक अश्लील व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तो गायब झाला होता. त्याने थेट मुंबई गाठली होती. चार दिवसांपासून फरार असलेल्या धामनोदियाला मुंबईत अटक करण्यात आली आणि त्याच्यावर बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
तिच्या वडिलांनी सांगितले, “माझी मुलगी १० फेब्रुवारीपासून बेपत्ता आहे. आम्ही सर्वजण खूप तणावाखाली होतो आणि स्थानिक पोलिसांना तिचा शोध घेण्यासाठी विनंती केली. मीही तिला शोधत होतो, पण काही दिवसांपासून तिचा पत्ता लागला नाही. तिच्या ठावठिकाण्याबद्दल काही सुगावा लागेल या आशेन आम्ही तिच्या मैत्रिणींशी बोललो. त्यानंतर मला पोलिस स्टेशनमधून फोन आला आणि मला माझ्या मुलीच्या एका मित्राच्या घरी येण्यास सांगितले. मी तिचे मोजे पाहिले आणि मला कळले की ही माझी मुलगी आहे आणि मी तिचा मृतदेह ओळखला. तिचा मृतदेह कोणत्या अवस्थेत आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही.”
पोलिसांनी दावा केला आहे की ती ८ सप्टेंबरपासून आरोपीशी संबंधात होती. “घटनेच्या वेळी, लग्नाच्या प्रश्नावरून त्यांच्यात भांडण सुरू होते. जेव्हा तिने सांगितलं की त्यांच्या लग्नाला घरातले परवानगी देणार नाहीत, तेव्हा त्याने रागाच्या भरात गळा दाबून तिची हत्या केली. त्यावेळी तो मानसिक संयम गमावून बसला आणि नंतर नवीन सिम मिळवून महाराष्ट्रात पळून गेला”, असा आरोप एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने केला. वडिलांनी सांगितले, “माझी मुलगी एमबीएच्या दुसऱ्या सत्रात होती. कॉलेजमध्ये तिची आरोपीबरोबर मैत्री झाली. तिला निर्दयपणे मारण्यात आले; तिचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. तिला गंभीर मानसिक त्रास देण्यात आला आणि नंतर त्यांची हत्या करण्यात आली.”
तरुणीच्या मृतेदह कसा सापडला?
पोलिस उपायुक्त कृष्णा लालचंदानी म्हणाले, तरुणीचा मृतदेह ज्या खोलीत होता, तिथून दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे त्यांच्या शेजाऱ्यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. तिथे स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस पथक पोहोचले. त्यांनी दरवाजा तोडल्यावर त्यांना बेडवर एक मुलगी निर्जीव अवस्थेत पडलेली आढळली.” “ही खोली मंदसौर येथील रहिवासी असलेल्या तरुणाने भाड्याने घेतली होती”, असे लालचंदानी म्हणाले. “मृतक आणि तरुण दोघेही इंदूरमध्ये एमबीएचे विद्यार्थी होते आणि एकमेकांशी नातेसंबंधात होते”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तरुणीच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, “माझी बहीण अभ्यासात खूप हुशार होती. तिने पदवी पूर्ण केली होती आणि एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होती. मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी तिने एमबीएचं शिक्षण घेण्याचं ठरवलं होतं. संपूर्ण कुटुंब या गोष्टीमुळे अस्वस्थ आहे. आम्ही तिला शोधत असताना आम्हाला कॉलेजकडून फोन आला; एका अधिकाऱ्याने आम्हाला सांगितले की तिचे अश्लील व्हिडिओ कॉलेजच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर लीक झाले आहेत. त्याने (आरोपी) माझ्या बहिणीची प्रतिष्ठा नष्ट केली आणि नंतर तिला मारले.” पोलिसांनी सांगितले की, कॉलेज अधिकाऱ्यांनी व्हिडिओ डिलीट केला आणि दुसऱ्या दिवशी महिलेच्या वडिलांशी संपर्क साधला आणि त्यांना कळवले की दोन्ही विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन बंद आहेत.
कॉलेजची फी भरण्याकरता तगादा?
दरम्यान, आरोपीच्या कॉलेजची फी भरण्यासाठी तिच्याकडे तगादा लावत होता. त्याकरता त्याने तिच्या फोटो आणि व्हिडिओंचा वापर करून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला, असाही दावा तरुणीच्या कुटुंबाने केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
