चीनमध्ये आत्तापर्यंत ६ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. याच कारणामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मॅक-डीने त्यांची ३०० रेस्तराँ बंद केली आहेत. १९९० च्या दशकापर्यंत मॅक डोनाल्ड या जगप्रसिद्ध फूड चेनचं एकही रेस्तराँ चीनमध्ये नव्हतं. मात्र त्यानंतर चीनमध्ये शेकडो रेस्तराँ सुरु झाली. त्यांना प्रतिसादही चांगला मिळाला. आता मात्र कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चीनमधली ३०० रेस्तराँ बंद करण्यात आली आहेत.
चीनमध्ये ज्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे त्यांना आम्ही मोफत अन्न पाठवण्याची व्यवस्था करणार आहोत असं मॅक-डी तर्फे सांगण्यात आलं आहे. फक्त मॅक-डीच नाही तर कॉफी चेन असलेल्या स्टार बक्सनेही इथली अनेक दुकानं बंद केली आहेत. द गार्डियनने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
आजच भारतातल्या केरळमध्ये एका विद्यार्थ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. हा विद्यार्थीही वुहान येथे गेला होता असेही समजले आहे. तिथेच त्यालाही लागण झाली. त्याच्यावर आता केरळमध्ये उपचार सुरु असून त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवलं जातं आहे. दरम्यान चीनमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून मॅकडोनाल्डने त्यांची ३०० रेस्तराँ बंद केली आहेत.