सायरस मिस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर रिक्त असलेल्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदी गुरूवारी एन. चंद्रशेखरन यांची निवड करण्यात आली. नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहातील टीसीएस या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. टाटा सन्सकडून २४ ऑक्टोबरला सायरस मिस्त्री यांची कंपनीच्या अध्यक्षपदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहातील सहा कंपन्यांच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यानंतर मिस्त्री यांनी टाटा समूहाला न्यायालयात खेचले होते.

कम्प्युटर अॅप्लिकेशन या विषयात मार्स्टसची पदवी घेतलेल्या चंद्रशेखरन १९८७ साली टाटा समूहात नोकरीला लागले. त्यानंतर उत्तरोत्तर प्रगती करत ते २००९ मध्ये ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. मिस्त्री यांच्या गच्छंतीनंतर टाटा सन्सच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत आले होते. चंद्रशेखरन हे काही काळासाठी सेंट्रल बँकेच्या संचालक मंडळावरही कार्यरत होते. उद्योगविश्वात ते चंद्रा या टोपणनावाने प्रसिद्ध आहेत. टाटा सन्सच्या संचालक मंडाळाच्या बैठकीत टाटा समूहातील वरिष्ठांनी एन. चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, एन. चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीमुळे रिक्त होणाऱ्या टीसीएसच्या सीईओपदी राजेश गोपीनाथन यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

टाटा उद्योग समुहाची धारक कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन सायरस मिस्त्री यांची २४ ऑक्टोबरला तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती. अवघ्या ४२ व्या वर्षी अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सायरस मिस्त्री यांना चार वर्षातच भारतातील सर्वात मोठ्या उद्योगसमुहाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले हे बघून सर्वांनाच धक्का बसला होता. त्यांच्या जागी हंगामी अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांची नियुक्ती करण्यात आली होती. सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटविण्याचा निर्णय अत्यंत अनपेक्षित असा होता. काल टाटा सन्सच्या संचालक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सर दोराबजी टाटा आणि सर रतन टाटा या दोन विश्वस्त मंडळांकडे टाटा सन्सच्या अध्यक्षाच्या निवडीचा आणि त्याला हटविण्याचा अधिकार आहे. त्यासाठी दोन्ही विश्वस्त मंडळांची स्वतंत्र तीन सदस्यीय समिती आहे. टाटा सन्समध्ये या दोन्ही ट्रस्टची मिळून ६६ टक्के इतकी मालकी आहे. तर, मिस्त्री यांच्या शापुरजी पालनजी कुटंबियांचा टाटा सन्समध्ये सर्वाधिक १८.४ टक्के इतका वाटा आहे. शापुरजी पालनजी समुहाने सायरस मिस्त्रींना अध्यक्षपदावरून दूर करणे, अवैध असल्याचे म्हटले होते. सायरस हे पालनजी मिस्त्री यांचे पूत्र असून ते समुहाचे प्रमुख आहेत. शापुरजी पालनजी समुहाने टाटा सन्सच्या या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे सांगत हा निर्णय एकमताने घेण्यात आला नसल्याचे म्हटले होते. टाटा सन्सच्या एकुण ९ संचालकांपैकी ८ सदस्यांनी काल मतदान केले. यापैकी सहाजणांनी सायरस मिस्त्री यांच्याविरोधात तर दोनजण तटस्थ राहिले.