पीटीआय, नवी दिल्ली

ऊर्जेच्या स्थिर व सुरक्षित पुरवठ्यासाठी भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाची खरेदी करताना विविध ठिकाणांहून खरेदी करतो, असा खुलासा परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी सोमवारी सांगितले. भारताने रशियाकडून तेलखरेदी थांबवली आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मिस्री यांनी या मुद्द्यावर भारताची भूमिका स्पष्ट केली.

“कच्च्या तेलाची खरेदी करताना राष्ट्रीय हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले जातील. तेलाची पुरेशी उपलब्धता, रास्त दर आणि पुरवठ्याची विश्वसनीयता यानुसार ऊर्जा धोरण निर्धारित केले जाते,” अशी माहिती मिस्री यांनी दिली.

दिल्लीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र सचिव म्हणाले की, “तेलासाठी आम्ही कोणत्याही एकाच विक्रेता देशावर विसंबून नाही. तसेच या देशांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या तेलाच्या प्रमाणात वेळोवेळी बदल होत जातो, हेही स्वाभाविक आहे. हे त्यावेळच्या बाजारपेठेच्या स्थितीवर अवलंबून असते.” भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराची घोषणा करताना ट्रम्प यांनी, भारत यापुढे रशियाकडून तेलखरेदी करणार नाही, असे एकतर्फी जाहीर करून टाकले होते. त्यावर विरोधी पक्षांसह विविध घटकांनी प्रश्न विचारले आहेत.