काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टीका केली होती. पंतप्रधान मोदी हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मुत्सद्देगिरी न दाखवता केवळ जागतिक नेत्यांना मिठ्या मारतात. गळाभेट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका करत राहुल गांधी यांनी मोदींची मिमिक्री केली होती. यावेळी राहुल गांधींनी व्यासपीठावरील एका काँग्रेस नेत्याची गळाभेट घेतली होती. मात्र, यावेळी काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा उल्लेख करत एक टिप्पणी केली होती. यावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे.

या संपूर्ण घडामोडींवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया देत काँग्रेस नेत्यांना चांगलंच सुनावलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना यावर भाष्य केलं आहे. ‘दोन्ही देशांच्या नेत्यांचा सन्मान राखला पाहिजे, भारत आणि इटलीचे संबंध दृढ असून एकमेकांबद्दल आदर बाळगणं आवश्यक आहे’, अशा शब्दांत रणधीर जयस्वाल यांनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं.

रणधीर जयस्वाल यांनी काय म्हटलं?

पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा उल्लेख केला होता. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना राजनैतिक संवादात परस्पर आदर राखण्याचं आवाहन रणधीर जयस्वाल यांनी केलं आहे.

जयस्वाल म्हणाले की, “भारताचे इटलीबरोबर संबंध दृढ आहेत. अलीकडच्या काळात हे संबंध सर्वच आघाड्यांवर विस्तारले आणि बळकट झाले आहेत. राजनैतिक प्रक्रियेचा भाग म्हणून एकमेकांचा आदर राखला पाहिजे. दोन्ही बाजूंमधील परस्पर समंजसपणाची जाणीव ठेऊन एकमेकांबद्दल आदर बाळगणं आवश्यक आहे.”

नेमकं काय घडलं होतं?

काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली होती आणि टीका करताना मोदींची मिमिक्री केली होती. यावेळी राहुल गांधींनी व्यासपीठावरील एका काँग्रेस नेत्याची गळाभेट घेतली होती. मात्र, यावेळी काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा उल्लेख करत एक टिप्पणी केली होती. संदीप दीक्षित यांनी राहुल गांधींना मिश्किलपणे म्हटलं होतं की, “मेलोनी समजून तुम्ही माझी गळाभेट घेतली नाही ना?” असं म्हटलं होतं. संदीप दीक्षित यांच्या या वक्तव्यानंतर आणि राहुल गांधी यांनी मोदींची मिमिक्री केल्यावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे.