दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या व्यापक धरपकड कारवाईवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेने तीव्र चिंता व्यक्त केली होती. यावर भारत सरकारने अतिशय आक्रमक आणि स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाची टिप्पणी “अनावश्यक आणि भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणारी आहे,” अशा शब्दांत भारताच्या परराष्ट्र मंत्राल्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. एवढेच नव्हे तर, जागतिक पातळीवरील विविध घटनांवर बोलताना मानवाधिकार आयोग कसा ‘दुटप्पी दृष्टिकोन’ बाळगतो, हे उघडं केलं आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
“भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही”; परराष्ट्र मंत्रालय काय म्हणाले?
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी UN मानवाधिकार कार्यालयाच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला. ते म्हणाले, “आम्ही नवी दिल्लीतील घटनांवर आलेली टिप्पणी पाहिली आहे. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, जिथे शांततापूर्ण मार्गाने एकत्र येण्याचा आणि विरोध दर्शवण्याचा अधिकार राज्यघटनेनेच प्रत्येक नागरिकाला दिला आहे. तसेच, स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि मुक्त माध्यमे या अधिकारांचे रक्षण करतात.”
पुढे आपली भूमिका मांडताना त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “इतर कोणत्याही लोकशाहीप्रमाणेच भारतीय नागरिक या अधिकाराचा वापर सार्वजनिक सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या चौकटीत राहूनच करतात. आपली कायदा अंमलबजावणी यंत्रणा पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करते आणि कोणालाही तक्रार असल्यास न्यायालयात जाण्याचे मार्ग खुले आहेत. त्यामुळे मानवाधिकार आयोगाची चिंता पूर्णपणे निरर्थक असून हा भारताच्या अंतर्गत बाबींत हस्तक्षेप करण्याचा प्रकार आहे.”
UN च्या ‘दुटप्पी धोरणावर’ भारताचा जोरदार प्रहार
पाकिस्तानसारख्या शेजारील देशांमध्ये आंदोलकांवर होणारे हिंसक अत्याचार आणि खुद्द फ्रान्ससारख्या पाश्चिमात्य देशांमध्ये आंदोलनांवर पोलिसांकडून होणाऱ्या कठोर कारवायांवर हा आयोग मूग गिळून गप्प राहतो, असा थेट टोला रणधीर जयस्वाल यांनी लगावला.
“OHCHR ची भूमिका ही अत्यंत निवडक आणि पूर्वग्रहदूषित राहिलेली आहे. आमच्या शेजारील देशांमध्ये झालेल्या हिंसक कारवायांवर किंवा स्वतःच्या जवळ असलेल्या देशांमधील पोलीस कारवाईवर हा आयोग कधीही भाष्य करत नाही. अशा दुटप्पी धोरणांमुळेच अशा आंतरराष्ट्रीय संस्थांची पत घसरत आहे आणि लोकांचा बहुपक्षीय व्यवस्थेवरील विश्वास उडत चालला आहे,” असे जयस्वाल यांनी आवर्जून सांगितले.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाने नक्की काय म्हटले होते?
दिल्लीतील व्यापक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर वकील, पत्रकार, नागरी समाजातील सदस्य आणि आंदोलकांना मोठ्या प्रमाणात ताब्यात घेण्यात आल्याच्या बातम्यांनंतर UN मानवाधिकार कार्यालयाचे प्रवक्ते थमीन अल-खीतान यांनी एक निवेदन जारी केले होते.
त्या निवेदनात त्यांनी म्हटले होते:
- भारताने शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करण्याच्या अधिकाराचा पूर्ण आदर केला पाहिजे.
- आंदोलकांवर निर्बंध घालताना ते किती आवश्यक आणि योग्य आहेत, याची कठोर तपासणी झाली पाहिजे.
- सुरक्षा दलांनी शांततापूर्ण आंदोलकांविरोधात संयम बाळगावा.
- ज्या लोकांना विनाकारण किंवा बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले आहे, त्यांची लवकरात लवकर आणि कोणतीही अट न ठेवता सुटका करावी.
- सरकारने आंदोलकांशी आणि नागरिकांशी चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढावा.
