India On Hindus Attacked In Bangladesh : बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार सुरू असून कट्टरपंथीयांकडून अल्पसंख्यांक समुदायातील नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एकूण स्थितीबाबत भाष्य केले असून या हिंसाचाराच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आवाहन बांगलादेशला केले आहे.
“कट्टरपंथीयांकडून अल्पसंख्याक समुदाय तसेच त्यांची घरे आणि व्यवसायांना वारंवार लक्ष्य केले जात असल्याचा त्रासदायक पॅटर्न आम्ही सातत्याने पाहत आहोत. अशा हिंसाचाराच्या घटनांविरोधात तातडीने आणि कठोर कारवाई होणे आवश्यक आहे,” असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले आहेत.
भारताने बांगलादेशातील अशा प्रकाराच्या हिंसाचाराचा संबंध वैयक्तिक वाद, राजकीय मतभेद किंवा इतर कारणांशी जोडण्याची वाईट सवय देखील यावेळी अधोरेखित केली. यासंदर्भात बोलताना जयस्वाल म्हणाले की, “असे दुर्लक्ष केल्याने फक्त गुन्हेगारांची हिंमत वाढते” आणि यामुळे अल्पसंख्याक समुदायच्या मनात भीती आणि असुरक्षितता जास्तच वाढते.
“आम्ही यापूर्वीच्या पत्रकार परिषदांमध्ये देखील या मुद्द्यावर वारंवार भाष्य केले आहे आणि बांगलादेशातील कट्टरपंथीयांकडून अल्पसंख्याक, त्यांची घरे आणि व्यवसाय यांच्यावर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांचा एक त्रासदायक पॅटर्न आम्हाला सातत्याने दिसत आहे,” असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिलने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२५ या महिन्यात जातीय हिंसाचाराच्या ५१ घटनांची नोंद झाली असून या हिंसाचारात १० जणांची हत्या करण्यात आली आहे.
भारताने गेल्या महिन्या जारी केलेल्या निवेदनात अधोरेखित केले होते की, अल्पसंख्यांकांच्या विरोधात हिंसाचाराच्या २९०० हून अधिक घटना घडल्या आहेत. यामध्ये हत्या, जाळपोळ आणि जमीन बळकावणे अशा घटनांचा समावेश आहे. अंतरिम सरकारच्या काळात घडलेल्या या घटनांची नोंद विविध स्रोतांकडून ठेवण्यात आली होती.
“या घटना फक्त माध्यमांनी केलेली अतिशयोक्ती म्हणून बाजूला सारता येणार नाहीत किंवा राजकीय हिंसाचार म्हणून नाकारता येणार नाहीत,” असेही जयस्वाल म्हणाले.
२०२४ मधील बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनातील एक महत्त्वाचे नेते उस्मान हादी यांची १२ डिसेंबर २०२५ रोजी ढाका येथे हल्लेखोरांनी डोक्यात गोळ्या झाडून हत्या केली, यानंतर बांगलादेशात चांगलाच हिंसाचार पेटल्याचे पाहायला मिळत आहे.
अल्पसंख्यांकांविरोधात हिंसाचार
मध्य बांगलादेशातील एका ४० वर्षीय महिलेवर दोन व्यक्तीनी कथितपणे बलात्कार केला, त्यांनी महिलेला झाडाला बांधले आणि तिचे केस कापले.
महिलेवर बालात्कार झाला त्याच दिवशी एका खोकोन चंद्र दास या हिंदू व्यक्तीला जमावाकडून मारहाण करत पेटवून देण्यात आले, ही घटना बांगलादेशच्या शरिअतपूर जिल्ह्यात घडली. दास हे एका तलावात उडी मारून तेथून सुटले, मात्र त्यांना झालेल्या जखमांमुळे नंतर त्यांचा मृत्यू झाला. २४ डिसेंबर रोजी अमृत मोंडल या आणखी एका हिंदू व्यक्तीची जमावाने हत्या केली. १८ डिसेंबर रोजी २४ वर्षीय दिपू चंद्र दास या तरुणाचीही जमावाने हत्या केली. त्याच्यावर ईशनिंदेचा खोटा आरोप करण्यात आला होता. हत्येनंतर त्याचा मृतदेह एका झाडाला लटकावून पेटवून देण्यात आला.
