मध्य पूर्वेत पेटलेला युद्धाचा भडका आता अधिकच तीव्र झालाआहे. इराणचे समर्थन असलेल्या येमेनमधील हुती विद्रोहींच्या सातत्याने सुरू असलेल्या हल्ल्यांनंतर सौदी अरेबियातील पवित्र शहर मक्कासह किनारपट्टीच्या भागात ‘एयर रेड अलर्ट’ (हवाई हल्ल्याचा इशारा) जारी करण्यात आला. मक्केच्या इतिहासात असा अलर्ट जारी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. या संदर्भातील वृत्त ‘NDTV’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.
मक्का हे सौदी अरेबियातील मक्का प्रांताची राजधानी व एक प्रमुख शहर आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मुहम्मद यांचे जन्मस्थान असलेले मक्का हे इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र स्थळ मानले जाते. दरवर्षी हज यात्रेच्या निमित्ताने मक्केला कोट्यवधी मुस्लिम भेट देतात.
या घटनेनंतर सौदी अरेबियाने आक्रमक भूमिका घेत हुती विद्रोहींना कडक शब्दांत ताकीद दिली आहे. मक्का आणि तेथील भाविकांची सुरक्षा ही आमच्यासाठी ‘रेड लाईन’ (अंतिम मर्यादा) असून, ही मर्यादा ओलांडल्यास हुतींना भीषण परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा सौदीच्या नेतृत्वाखालील युतीने दिला आहे.
मक्केच्या प्रतिबंधित ड्रोनचा शिरकाव करण्याचा प्रयत्न
सौदी अरेबियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने मक्केच्या दक्षिणेकडे हुती विद्रोहींचे एक सशस्त्र ड्रोन यशस्वीपणे रोखून ते हवेतच नष्ट केले. हे ड्रोन मक्केच्या प्रतिबंधित हवाई हद्दीत प्रवेश करण्याच्या तयारीत होते. या घटनेनंतर मक्का, जिद्दा आणि ताईफ प्रांतातील सुरक्षा यंत्रणांना तत्काळ अलर्ट मोडवर ठेवण्यात आले.
इज्रायलमधील ‘हायोम’ या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, या घटनेमुळे मदिना येथील प्रिन्स मोहम्मद बिन अब्दुलअजीज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (MED) विमान वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे रोखण्यात आली होती.
दरम्यान, या कारवाईच्या अवघ्या एक दिवस आधी हुती विद्रोहींनी सौदीवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यात १३ जण गंभीर जखमी झाले होते, तर काही तेल प्रकल्पांना आग लागली होती.
५७ मुस्लिम देशांच्या संघटनेकडून तीव्र निषेध: ‘रेड लाईन’चा इशारा
मक्केवर झालेल्या या संभाव्य हल्ल्याच्या प्रयत्नावर ५७ मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ने (OIC) अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
OIC चे प्रवक्ते तुर्की अल-मालिकी यांनी स्पष्ट केले की, “दोन पवित्र मशिदी (मक्का आणि मदिना) आणि जगभरातून येणाऱ्या भाविकांची सुरक्षा ही आमच्यासाठी ‘लाल रेषा’ आहे. हुतींच्या या दुष्ट कृत्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सौदी युती सर्व आवश्यक ती कठोर पावले उचलण्यास अजिबात हिचकिचाट करणार नाही.”
हुती विद्रोहींचे स्पष्टीकरण: “आम्ही मक्केला लक्ष्य केले नाही”
दुसरीकडे, सौदी अरेबियाचा दावा हुती विद्रोहींनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. मक्केवर हल्ला करण्याचा कोणताही प्रयत्न केला नसल्याचे स्पष्ट करत हुतींनी सौदीचा दावा म्हणजे ‘जुना खोटारडेपणा’ असल्याचे म्हटले आहे.
हुतींच्या राजकीय विभागाचे नेते हाजेम अल-असद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिले की, “मक्केला लक्ष्य केल्याचे दावे पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत. सौदी जनतेची दिशाभूल करण्यासाठी हाच जुना खोटा प्रयोग पुन्हा करत आहे, ज्यावर आता कोणीही विश्वास ठेवणार नाही.”
तसेच, “सौदी अरेबिया जोपर्यंत येमेनच्या जनतेवर अन्याय आणि आक्रमण करत राहील, तोपर्यंत आमचा पलटवार असाच सुरू राहील आणि त्याची तीव्रता वाढेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
समुद्रात तणाव; जागतिक अर्थव्यवस्थेला धोका
येमेनमधील गृहयुद्धाने जुलै महिन्यात पुन्हा पेट घेतला, जेव्हा हुतींनी सौदी अरेबियावर सागरी नाकेबंदी (Maritime Blockade) घोषित केली आणि लाल समुद्रातील (Red Sea) सौदीच्या मालवाहू जहाजांवर हल्ले सुरू केले.
तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर कतारने जागतिक समुदायाला धोक्याची घंटा दिली आहे. ‘बाब अल-मंदाब’ हा महत्त्वाचा सागरी मार्ग बंद झाल्यास संपूर्ण जगासाठी ते अत्यंत विनाशकारी ठरेल, अशी भीती कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी इब्राहिम अल-हाश्मी यांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेचा हस्तक्षेपास नकार; सौदीची कोंडी
या युद्धाच्या भीषण वळणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला मोठा धक्का दिला आहे. सौदीच्या क्राउन प्रिन्सने या प्रकरणात अमेरिकेने थेट हस्तक्षेप करावा अशी विनंती केली होती, परंतु ट्रम्प यांनी ती फेटाळून लावली. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, हुती विद्रोहींनी वॉशिंग्टनशी संपर्क साधून अमेरिकेला या युद्धात दूर राहण्याची विनंती केली आहे.
इराणचा पाठिंबा असलेले हुती विद्रोही आता तांबड्या समुद्रातील अत्यंत महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर वेगाने ताबा मिळवत आहेत. अमेरिकेने हात वर केल्यामुळे आता या संकटाचा सामना कसा करायचा, असा मोठा प्रश्न सौदी अरेबियाच्या नेतृत्वापुढे उभा ठाकला आहे.
