सरदार सरोवरावर बांधण्यात येणाऱ्या धरणाच्या उंचीविरोधात उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि इतर कार्यकर्त्यांना जबरदस्तीनं हटविण्यात आलं आहे. या सगळ्या दरम्यान पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात वाद पेटला. काही प्रमाणात बाचाबाचीही झाली, त्यानंतर पोलिसांनी मेधा पाटकर यांच्यासहित सगळ्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

मेधा पाटकर आणि त्यांचे सहकारी गेल्या ११ दिवसांपासून धार जिल्ह्यातील चिखल्दा गावात उपोषण करत आहेत. आज या उपोषणाचा १२ वा दिवस होता. मेधा पाटकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रकृती बिघडली आहे मात्र याचा विचार न करता पोलिसांनी या सगळ्यांना जबरदस्तीनं हटवलं आहे. या देशात महात्मा गांधीच्या स्वप्नांची हत्या झाली आहे अशी जळजळीत प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी दिली आहे.

सरदार सरोवरावरील धरणाची उंची वाढविल्यास नर्मदा नदी क्षेत्राततल्या १९२ गावांना त्याचा फटका बसणार आहे, ज्यामुळे ४० हजार कुटुंबं विस्थापित होण्याची भीती आहे. प्रत्येक माणसाचं पुनर्वसन होत नाही तोवर उपोषण मागे घेणार नाही अशी आग्रही भूमिका मेधा पाटकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. मात्र आज अखेर बळाचा वापर करत पोलिसांकडून मेधा पाटकर यांना अटक करण्यात आली आहे.

२७ जुलैपासून मेधा पाटकर आणि त्यांचे कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मेधा पाटकर यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती मात्र ती त्यांनी ऐकली नाही. भय्युजी महाराजांनीही मेधा पाटकर यांना फोन करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली मात्र तरीही हे उपोषण मागे घेण्यात आलेलं नाही. आता अखेर पोलिसांनी मेधा पाटकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

आमच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता शिवराज चौहान आणि नरेंद्र मोदी सरकारनं आमच्यावर थेट कारवाई केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या राज्यघटनेवर या कोणाचाही विश्वास नाही असंच दिसून येतं आहे त्यामुळे आम्ही या अटकेचा निषेध करतो अशी तिखट प्रतिक्रिया मेधा पाटकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

सरदार सरदार सरोवरावर बांधण्यात येणाऱ्या धरणाच्या उंचीवरून मेधा पाटकर आणि मध्यप्रदेश सरकार यांच्यात संघर्ष सुरू आहे. या संघर्षानं आता रौद्ररूप धारण केलं आहे. कारण मेधा पाटकर यांनी १२ दिवस उपोषण न सोडल्यानं आता पोलिसांनी बळाचा वापर करत मेधा पाटकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे आणि त्यांचं उपोषण आंदोलन उधळून लावलं आहे.