कॉपी व इतर गैरप्रकारांमुळे रद्द करण्यात आलेली अखिल भारतीय वैद्यक प्रवेश पूर्वपरीक्षा (एआयपीएमटी) पुन्हा घेण्यास सीबीएसई मंडळाला सर्वोच्च न्यायालयाने वेळ वाढवून दिला असून, १७ ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर करण्यास सांगितले आहे. आधी त्यासाठी चार आठवडे कालावधी दिला होता पण त्यात फेरपरीक्षा घेऊन निकाल लावणे शक्य नसल्याने न्यायालयाकडे आणखी कालावधीची मागणी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) केली होती.
आधीच्या परीक्षेत मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने १५ जून रोजी अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेश पूर्वपरीक्षा रद्द केली होती व चार आठवडय़ात पुन्हा परीक्षा घेण्याचा आदेश दिला.
सीबीएसईच्या वतीने बाजू मांडताना महाधिवक्ता मुकुल रोहटगी यांनी न्या. ए.के.आग्रवाल व ए.एम.सप्रे यांना सांगितले की, फेरपरीक्षा घेण्यासाठी चार आठवडय़ांचा अवधी अपुरा आहे. परीक्षा एक हजार केंद्रांवर घ्यावी लागणार आहे, त्यातच शाळा सुरू झाल्याने शिक्षकांची कमतरता आहे, पुन्हा प्रश्नपत्रिका काढण्यासाठी मंडळाला काही वेळ लागणार आहे. परीक्षेसाठी जास्त शाळा लागतात व परीक्षकही लागतात. साधारण अशी परीक्षा घेण्यास सात महिने लागतात, पण आम्ही तीन महिन्यांचा कालावधी मागितला आहे.
न्यायालयाने सांगितले की, पूर्वी सगळे काही एक महिन्यात करण्यात आले. आपण तंत्रज्ञानाच्या जमान्यात राहतो त्यामुळे सर्व काही शक्य आहे. अतिरिक्त महाधिवक्ता तुषार मेहता यांनी भारतीय वैद्यक परिषदेची बाजू मांडताना सांगितले की, सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या काळात परीक्षा घ्यावी हा मुद्दा आम्ही लावून धरला. जर वेळ पाळली नाही तर राज्यांचा कोटा भरला जाऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. त्याचा परिणाम पदव्युत्तर प्रवेशावर होईल, हे आम्हाला मान्य आहे.