Meerut Crime News : देशभरातील विविध शहरांत रोज अनेक गुन्हेगारीच्या घटना घडल्याचं पाहायला मिळतं. गुन्हेगारीच्या घटना कमी होण्यासाठी सरकार कायम प्रयत्न करतं. मात्र, तरीही गुन्हेगारीच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. कधी संपत्तीचा वाद तर कधी घरगुती हिंसाचार किंवा किरकोळ वादातून थेट खून झाल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत.
आता मेरठमध्येही एक अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. मेरठमधील एका मुलाने मद्यधुंद अवस्थेत जन्मदात्या वडिलांची हत्या केली आहे. या घटनेमुळे मेरठमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दारू पिऊन झालेल्या भांडणातून मुलाने स्वत:च्या वडिलांना विटांनी मारहाण केली आणि या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
मेरठमधील सिव्हिल लाईन्स परिसरात दारू पिऊन झालेल्या भांडणानंतर मुलाने स्वत:च्या वडिलांना विटाने मारहाण केली. एवढंच नाही तर वडिलांना मारहाण केल्यानंतर या आरोपीने स्वतःचं मनगटही कापल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि घटनेची माहिती पोलिसांपर्यत पोहोचली.
काही वेळाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी सांगितलं की, वडील आणि मुलगा एकत्र दारू पित असताना त्यांच्यात वाद झाला. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. त्यानंतर मुलाने कथितपणे एका विटाने वडिलांना मारहाण केली आणि यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता वडिलांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
मृत व्यक्तीचं नाव राजेश असं असून ते मूळचे बिहारमधील रहिवासी आहेत. ते सुमारे २० वर्षांपासून मेरठमध्ये राहत होते. हे दोघेही परिसरातील दुकानांमधून भंगाराचा व्यापार करत होते. पोलिसांनी सांगितलं की राजेश आणि अमन या दघांनाही दारूचं व्यसन होतं.
दरम्यान, या घटनेबाबत मेरठ शहराच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, “पोलिसांना रात्री १२.३० च्या सुमारास घटनेची माहिती मिळाली. या वादात अमनने राजेशच्या डोक्यावर वार केला. जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. आरोपी अमनला ताब्यात घेण्यात आलं असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.”
