Doctor Used Fevikwik: उत्तर प्रदेशच्या मेरठमधून एक गंभीर प्रकार समोर आला आहे. येथील एका अडीच वर्षाच्या मुलाच्या डोक्याला दुखापत झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे मुलाच्या जखमेवर टाके घालण्याऐवजी फेविक्विक लावण्यात आले. ही घटना मेरठमधील खासगी रुग्णालयात घडली. सदर प्रकार पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. यानंतर याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
तपासात समोर आले की, अडीच वर्षांचा मुलगा खेळत असताना पडला. त्याच्या डोळ्याच्या वरच्या भागाला दुखापत झाली आणि रक्तस्राव व्हायला लागला. पालकांनी त्याला मेरठमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्याच्या जखमेवर टाके घालण्याऐवजी पाच रुपयांच्या फेविक्विकने त्याची जखम भरण्यात आली.
यावेळी लहान मुलगा वेदनेने विव्हळत होता. त्यावर डॉक्टर म्हणाले की, तो घाबरलेला आहे. थोड्या वेळात वेदना कमी झाली की, तो शांत होईल. मात्र त्यानंतरही वेदना कमी झाली नाही, त्यामुळे पालकांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेले. तिथे मुलाच्या जखमेवरून फेविक्विक हटविण्यासाठी तीन तास लागले. त्यानंतर त्याच्या जखमेवर टाके घालण्यात आले.
मेरठमधील जागृती विहार एक्सटेन्शन येथील मेपल्स हाइट नामक परिसरात सदर घटना घडली. सरदार जसपिंदर सिंह यांचा अडीच वर्षांचा मुलगा मनराज सिंह खेळता खेळता पडला होता. पडताना टेबलाचा कोपरा लागल्यामुळे त्याच्या कपाळातून रक्त वाहू लागले. जवळच्या खासगी रुग्णालयात मुलाला दाखल केले असता त्यांनी केवळ पाच रुपयांच्या फेविक्विकने त्याच्यावर उपचार केले.
दुसऱ्या रुग्णालयाने वेळीच योग्य ते उपचार केल्यामुळे आता सदर मुलगा धोक्याच्या बाहेर आहे. पालकांनी आरोप केला की, डोळ्यांच्या वर लावलेली फेविक्विक जर डोळ्यात गेली असती तर अनर्थ झाला असता. पालकांनी तक्रार केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक कटारिया यांनी चौकशी सुरू केली आहे. यातून जी माहिती समोर येईल, त्यानुसार कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
