उत्तर प्रदेशातील मेरठ येथे पतीची हत्या करून त्याचा मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याचा बनाव रचणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जयवीर सिंह नागर यांनी रवीता कश्यप (३०) आणि अमरदीप (२३) यांना अमित कश्यप (३२) यांच्या हत्येप्रकरणी ही शिक्षा सुनावली. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सक्सप्रेसने दिले आहे.

मेरठमधील ‘ब्लू ड्रम’ हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत हा निकाल आला आहे. मुस्कान आणि साहिल यांनी मुस्कानचा पती सौरभ राजपूत याची हत्या करून त्याच्या शरीराचे तुकडे सिमेंटने भरलेल्या निळ्या ड्रममध्ये ठेवल्याचा आरोप होता. विशेष म्हणजे, रवीता आणि मुस्कान या दोघीही चौधरी चरण सिंह जिल्हा कारागृहातील २बी या एकाच बराकीत आहेत.

पतीच्या मृतदेहाजवळ जिवंत साप ठेवला

अमित कश्यप हा मेरठमधील अकबरपूर सदात गावात टाइल्स आणि दगड बसवण्याचे काम करायचा. अमरदीपही त्याच्यासोबत काम करत होता. कामानिमित्त तो अमितच्या घरी जात असे. याच काळात अमरदीप आणि रवीता यांच्यात जवळीक निर्माण झाल्याचा आरोप आहे. अमितला त्यांच्या संबंधांची माहिती मिळाल्यानंतर दोघांनी त्याची हत्या करण्याचा कट रचल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले.

१३ एप्रिल २०२५ रोजी अमितचा मृतदेह त्याच्या पलंगावर आढळला. त्याच्या शरीरावर खुणा होत्या आणि जवळच जिवंत घोणसासारखा दिसणारा ‘हॉर्स-व्हिप’ साप सोडण्यात आला होता. अमितचा मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याचे रवीताने कुटुंबीयांना सांगितले. सुरुवातीला कुटुंबीयांनीही तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला. मात्र, अमितच्या मानेवरील खुणांमुळे नातेवाइकांना संशय आला. त्यांनी मृतदेह रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करण्याचा आग्रह धरला. शवविच्छेदन अहवालात अमितचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच, त्याच्या जवळ ठेवलेला साप विषारी नसल्याचेही समोर आले.

सापासाठी दिले होते एक हजार रुपये

पोलिसांनी गुन्हा दाखल करून रवीताची चौकशी केली. चौकशीदरम्यान तिने गुन्ह्याची कबुली दिल्याचे आणि अमरदीपसोबतच्या संबंधांची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दोघांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. तपासात दोघांनी एका साप पकडणाऱ्याकडून एक हजार रुपये देऊन साप विकत घेतल्याचे समोर आले. धार्मिक कार्यक्रमात पूजेसाठी साप हवा असल्याचे त्यांनी त्याला सांगितल्याचा आरोप आहे. १२ एप्रिलच्या रात्री अमित झोपल्यानंतर रवीताने अमरदीपला घरी बोलावले. त्यानंतर दोघांनी अमितची हत्या करून त्याच्या पलंगावर साप सोडल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सरकारी पक्षाने सांगितले. अमरदीप तेथून निघून गेल्यानंतर रवीता दुसऱ्या खोलीत जाऊन झोपली होती.

१२ साक्षीदारांची साक्ष; शिक्षेविरोधात अपील करणार

बहुचर्चित हत्या प्रकरणात न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी मोठा निर्णय देत आरोपी रवीता आणि अमरदीप यांना हत्येचा आणि कट रचल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले आहे. निर्णयापूर्वी अमरदीप हा जामिनावर बाहेर होता, मात्र दोषी सिद्ध झाल्यानंतर त्याला तातडीने ताब्यात घेण्यात आले; तर दुसरीकडे रवीता आधीपासूनच न्यायालयीन कोठडीत होती.

अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील फरजाना मकसूद यांनी दिलेल्या माहितीनुसार, या खटल्यात सरकारी पक्षाच्या १२ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. दरम्यान, बचाव पक्षाचे वकील ओंकार भाटी यांनी या निकालाविरोधात अपील दाखल करणार असल्याचे सांगितले. शिक्षा सुनावताना न्यायालयाने मनुस्मृतीचा संदर्भ देत, “शिक्षेची भीती समाजाला नियंत्रणात ठेवते,” असे नमूद केले.