Colonel Sofiya Qureshi Sister Dr Shyna Sunsara: पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानी दहशतवादाला धडा शिकवला. या ऑपरेशनची माहिती देण्यासाठी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग पत्रकार परिषदेत दिसल्या. त्यानंतर तीन दिवसांपासून परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत याच दोघी लष्करी कारवाईची माहिती देत आहेत. सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांच्याबद्दलची माहिती जाणून घेण्यास अनेकजण रस दाखवत आहेत. सोफिया कुरेशी यांना लष्करी सेवेचा वारसा घरातूनच लाभलेला आहे. आता त्यांच्या जुळ्या बहिणीबद्दलही माहिती समोर येत आहे.
कर्नल सोफिया कुरेशी यांच्या जुळ्या बहिणीचे नाव डॉ. शायना सनसारा असे आहे. ७ मे रोजी जेव्हा सोफिया कुरेशी वाहिनीवर भारताच्या कारवाईची माहिती देताना दिसल्या तेव्हा इतर देशवासियांप्रमाणेच शायना सनसारा यांनाही प्रचंड आनंद झाला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. याबद्दलची माहिती त्यांनी आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये दिली आहे. सोफिया फक्त माझी बहीण नसून ती संपूर्ण देशाची मुलगी, बहीण आहे, असे शायना म्हणाल्या.
कर्नल सोफिया कुरेशी आणि डॉ. शायना सनसारा यांचा जन्म गुजरातमधील वडोदरा येथील लष्करी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात झाला. “देशाची सेवा करण्यासाठी आम्हा दोघी बहिणींना सैन्यात जायचे होते. तेव्हा सैन्यात महिलांनी प्रवेश घेणे तितके सोपे नव्हते. पण सोफिया म्हणायच्या की, त्या डीआरडीओमध्ये वैज्ञानिक म्हणून काम करतील आणि तिथून सैन्यात रुजू होतील”, अशी आठवण शायना सनसारा यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितली.
कोण आहेत डॉ. शायना सनसारा?
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याप्रमाणेच डॉ. शायना सनसारा या प्रतिभावान आहेत. त्या अर्थशास्त्र, फॅशन डिझायनर, माजी लष्करी प्रशिक्षणार्थी, पर्यावरणवादी, रायफल शुटिंगमध्ये सुवर्ण पदक विजेत्या (राष्ट्रपतींच्या हस्ते) अशा नानाविध क्षेत्रात त्या पारंगत आहेत. यामुळेच त्यांना वंडर वुमनही म्हटले जाते. त्यांनी गुजरातमध्ये एक लाख वृक्ष लावण्याचा संकल्प केला होता.
याशिवाय त्यांनी मिस गुजरात, मिस इंडिया २०१७, मिस युनायटेड नेशन्स २०१८ अशा स्पर्धा जिंकलेल्या आहेत. भारतीय फॅशन जगतात दिलेल्या योगदानाबाबत त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने, २०१८ गौरविण्यात आलेले आहे.
सोफिया कुरेशी टीव्हीवर येऊन ऑपरेशन सिंदूरची माहिती देणार आहेत, याची शायना सनसारा किंवा कुटुंबातील इतर कुणालाही माहिती नव्हती. टिव्हीवर जेव्हा कर्नल सोफिया कुरेशी दिसल्या तेव्हा काही नातेवाईकांनी त्यांना फोन करून याची माहिती दिली. शायना सनसारा यांनी तात्काळ टीव्ही लावून पाहिले, तेव्हा त्यांना आपल्या बहिणीचा अभिमान वाटला. “हा केवळ आमचा नाही तर देशासाठीही अभिमानाचा क्षण होता. भारत सरकार आणि पंतप्रधान मोदींनी या कृतीतून अतिशय चांगला संदेश दिला”, अशी प्रतिक्रिया डॉ. शायना सनसारा यांनी दिली.