चीन आणि पाकिस्तानशी लगत असणाऱ्या सीमारेषेवर वाढलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराचे टॉप अधिकारी सोमवारी एक उच्चस्तरीय बैठक करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत चीन-पाकिस्तानच्या वाढत्या कारवायांना प्रत्युत्तर देण्याबाबतच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

मागील काही काळापासून पाकिस्तानकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करण्यात आले आहे. याचबरोबर पाकिस्तानचा घुसखोरीचा प्रयत्न देखील नेहमीच सुरू असतो. तर, दुसरीकडे चीनकडूनही पूर्व सीमेवर सैन्य तैनात केले जात आहेत.

वृत्तसंसस्था एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने माहिती दिली आहे की, लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत चीनशी लगत असलेल्या उत्तर सीमेवरील परिस्थिती आणि पश्चिम सीमेवर दहशतवाद्यांना पाठबळ देण्यासाठी पाकिस्तानच्या सुरू असलेल्या कुरापतींबाबत चर्चा केली जाऊ शकते. याचबरोबर या बैठकीत पंजाब आणि त्याभागाशी लगत असलेल्या परिसरात पाकिस्तानी आर्मी आयएसआयच्या कारवायांबाबत देखील चर्चा केली जाऊ शकते.