राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक

नवी दिल्ली : ‘पेगॅसस’च्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये गुरुवारीही तोडगा निघाला नसल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सातत्याने कामकाज तहकूब होत राहिले. केंद्रावरील दबाव वाढवण्यासाठी विरोधी पक्षांनी शुक्रवारी सकाळी दहा वाजता बैठक बोलावली असून त्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही सहभागी होणार आहेत.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या संसदेतील दालनात लोकसभा व राज्यसभेतील गटनेत्यांच्या होणाऱ्या बैठकीनंतर सर्व विरोधी पक्षांचे नेते ‘जंतरमंतर’वर किसान संसद घेणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. याबाबत बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. केंद्र सरकार विरोधकांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करत असले तरी आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न, इंधन दरवाढ तसेच, पेगॅससच्या मुद्द्यावर लढत राहू, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.

विरोधक केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. गेल्या आठवड्यात दोन वेळा तर, बुधवारी कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये १५ विरोधी पक्षांच्या नेत्यांची विविध मुद्द्यांवर एकजुटीसाठी बैठक झाली, या रणनीतीचा भाग म्हणून शुक्रवारीही बैठक होणार असल्याचे सांगितले जाते. ‘युवा काँग्रेस’च्या वतीने गुरुवारी शेती कायदे, पेगॅसस आणि इंधन दरवाढ हे तीन मुद्दे घेऊन ‘संसद घेराव’ आंदोलन करण्यात आले.

गोंधळ कायम

‘पेगॅसस’वरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये दिवसभर गोंधळ सुरू होता. या गोंधळातच राज्यसभेत अरुणाचल प्रदेशमधील अनुसूचित जमातींच्या हक्कासंदर्भातील विधेयक आवाजी मतदानाने संमत करण्यात आले. राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील विधेयकही राज्यसभेत विनाचर्चा मंजूर करण्यात आले. हे विधेयक बुधवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. दुपारच्या सत्रातही लोकसभेचे कामकाज तहकूब झाले, संध्याकाळी पाचनंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अत्यंत महत्त्वाचे करविषयक दुरुस्ती विधेयक सभागृहात मांडले.