उपस्थित मुख्यमंत्र्यांची अवस्था कळसूत्री बाहुल्यांसारखी, ममता बॅनर्जी यांची टीका

करोनाच्या स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत घेतलेल्या बैठकीचा पूर्णपणे विचका झाला, त्या बैठकीत आपल्यासह अनेक मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधीच देण्यात आली नाही, हा प्रकार त्यांचा अपमान केल्यासारखाच आहे, भाजपशासित राज्यांमधील मुख्यमंत्र्यांनाच केवळ बोलण्याची संधी देण्यात आली तर इतरांची अवस्था कळसूत्री बाहुल्यांसारखी होती, असा आरोप गुरुवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.

मोदी यांनी काळ्या बुरशीबाबत एकही प्रश्न विचारला नाही, राज्यात काळ्या बुरशीची लागण झालेले चार रुग्ण आहेत, असे त्या म्हणाल्या. करोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याचा दावा मोदींनी केला आहे, असे असताना करोनामुळे अनेकांचा मृत्यू होत असल्याचे वृत्त का येत आहे, असा सवालही त्यांनी केला. देशातील करोनाच्या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारकडे कोणतीही योग्य योजना नाही, असा आरोपही या वेळी ममतांनी केला.

‘पंतप्रधानांकडून विचारणा नाही’

आमचा पाणउतारा करण्यात आल्यासारखे वाटते, देशातील संघराज्य रचनेवर बुलडोझर फिरवण्याचा हा प्रयत्न आहे, पंतप्रधान मोदी यांनी आमचे म्हणणेच ऐकून घेतले नाही इतके त्यांना असुरक्षित वाटते का, असे ममता यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. पश्चिम बंगालमध्ये करोनाची स्थिती कशा पद्धतीने हाताळण्यात येत आहे, राज्याकडे लशीचा अथवा प्राणवायूचा किती साठा आहे, याबाबत मोदी यांनी साधी विचारणाही केली नाही.

राज्य, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी २० लाख मात्रा उपलब्ध करून द्या!

पश्चिम बंगालमधील सर्व राज्य आणि केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी लशीच्या किमान २० लाख मात्रा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गुरुवारी एका पत्राद्वारे केली आहे.

बँक, रेल्वे, विमानतळ कर्मचारी त्याचप्रमाणे संरक्षण दल किंवा कोळसा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसह अन्य ज्या कर्मचाऱ्यांना करोनाची लागण होण्याचा धोका अधिक आहे त्यांना केंद्राच्या धोरणामध्ये स्थानच देण्यात आलेले नाही, असे ममता यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.

पश्चिम बंगालमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर करोनायोद्ध्यांचे लसीकरण करण्यासाठी पावले उचलली आहेत, मात्र सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी आम्हाला अद्यापही किमान २० लाख मात्रांची गरज आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

ममता ‘नाटक’ करीत असल्याचा केंद्रीय अधिकाऱ्यांचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत अनेक मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही, हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेला आरोप म्हणजे ‘नाटक’ असल्याचा आरोप केंद्र सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी केला आहे.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये होणाऱ्या बैठकीला, मग ती करोनावरील बैठक असो किंवा करोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी झालेल्या बैठका असोत, ममता हजर राहात नाहीत हा इतिहास आहे, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालच्या २४ उत्तर परगणा जिल्ह्यातील दंडाधिकाऱ्यांना ममतांनी बोलू दिले नाही, कारण ममतांना बैठकीनंतर ‘नाटक’ करावयाचे होते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.