Meghalaya Honeymoon Murder राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम यांची चर्चा मागच्या महिन्यापासून होते आहे. कारण या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला. राजाबरोबर मधुचंद्राला गेलेल्या सोनमने तिच्या बॉयफ्रेंडच्या आणि इतर तिघांच्या मदतीने राजाची हत्या केली. सुरुवातीला म्हणजेच २३ मे रोजी जेव्हा हे जोडपं बेपत्ता झालं तेव्हा पोलिसांना अपहरणाचा संशय होता. राजाचा मृतदेह २ जूनला मिळाला. तरीही सोनम बेपत्ता होती. राजाची हत्या झाली त्या प्रकरणात राज कुशवाहाला अटक झाल्यानंतर ८ जूनच्या रात्री उशिरा सोनम पोलिसांना शरण गेली. त्यानंतर हे भयंकर प्रकरण समोर आलं. आज पोलिसांनी सोनमला घटनास्थळी नेलं होतं. तिथे नेमकं काय काय घडलं ते सोनमने पोलिसांना सांगितलं.
सोनम आणि इतर आरोपींना पोलिसांना काय सांगितलं?
सोनम रघुवंशीला आज पोलीस घटनास्थळी म्हणजेच शिलाँगला घेऊन गेले होते. याबाबत ईस्ट खासी हिल्सचे पोलीस अधीक्षक विवेक सैय्याम यांनी माहिती दिली. ते म्हणाले सोनम आणि इतर आरोपींना आम्ही आज गुन्हा ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो. क्राईम सीन रिक्रिएट करण्यात आला. म्हणजेच सोनम आणि इतर चौघांनी मिळून राजा रघुवंशीची हत्या कशी केली हे पोलिसांनी या चौघांकडून रिक्रिएट केलं.
राजावर पहिला वार कुणी केला?
सोनम आणि इतर आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार राजाची हत्या करण्यापूर्वी त्याच्यावर सर्वात पहिला वार विशालने केला होता. दुसरा वार आनंदने केला होता तर तिसरा वार आकाशने केला होता. पोलीस अधीक्षक सैय्याम म्हणाले आम्ही आता या प्रकरणात आणखी एक हत्यार वापरलं गेलं होतं ते शोधत आहोत. तसंच सैय्याम म्हणाले जेव्हा राजाची हत्या करण्यात आली तेव्हा सोनम तिथेच उभी होती. सोनमने जेव्हा तीन आरोपींना इशारा केला तेव्हाच राजा रघुवंशीवर हल्ला करण्यात आला. राजावर पहिला वार विशालने केला तेव्हा तो खाली पडला. त्यानंतर सोनम तिथून थोडी पुढे पळाली कारण राजा किंचाळत होता. तेवढ्यात इतर दोघांनीही त्याच्यावर वार केले आणि त्याची हत्या केली. एवढंच नाही तर ही घटना घडण्याच्या तीन ते चार किमी आधी आकाश, आनंद आणि विशाल यांनी राजावर हल्ला करायचा प्रयत्न केला होता. पण त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे ते पुढे जात राहिले.
आरोपींनी तीनवेळा प्रयत्न केला, चौथ्या प्रयत्नात राजाची हत्या
सैय्याम यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी राजाची हत्या झाली त्या आधी तीन ठिकाणी राजाची हत्या करण्याचा प्रयत्न या तिघांनी केला होता. या तिन्ही ठिकाणी सोनमसह सर्व आरोपींना नेण्यात आलं. राजाच्या हत्या प्रकरणात सोनम, राज कुशवाहा, आकाश, आनंद आणि विशाल या सगळ्यांना अटक झाली आहे. त्यांनी ज्या प्रमाणे जबाब नोंदवले त्या प्रमाणे मर्डर सीन रिक्रिएट करण्यात आला. या सगळ्याचं व्हिडीओ चित्रणही आम्ही केलं आहे त्यामुळे राजाने सोनमची हत्या कशी केली याचा ठोस पुरावा आमच्याकडे आता आहे असंही सैय्याम यांनी सांगितलं. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.