Bangladesh News : बांगलादेशातील विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येतील दोन प्रमुख संशयित सीमा ओलांडून भारतात दाखल झाल्याचा दावा बांगलादेशातील काही माध्यमांकडून केला जात आहे. ढाका पोलिसांच्या हवाल्याने करण्यात आलेला हा दावा मेघालय पोलिस आणि सीमा सुरक्षा दल (BSF) ने पूर्णपणे फेटाळून लावला आहे.
बांगलादेशातील काही माध्यमांकडून खोटे आणि बनावट माहिती दिली जात आहे, ज्यामुळे तेथील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे आणि यामुळे मेघालयातील शांतता आणि स्थैर्याला धोका निर्माण होऊ शकतो. हे एक संवेदनशील सीमेवरील राज्य आहे आणि येथे वारंवार दोन गटांमधील चकमकी आणि सीमेपलीकडील गुन्ह्यांना सामोरे जावे लागते, असे वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. हिंदुस्तान टाइम्सने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
मेघालय पोलिस मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शेजारच्या देशाने केलेला दावा फेटाळून लावला आहे. बांगलादेशच्या पोलिसांनी दावा केला होता की, उस्मान हादी या विद्यार्थी नेत्याच्या हत्येतील दोन आरोपी- फैझल करीम मसूद आणि आलमगीर शेख हे बांगलादेशातील मैमनसिंग जिल्ह्यातील हलुआघाट सीमेवरून भारतात पळून आले आहेत आणि ते सध्या भारतातील राज्यात असल्याचा दावाही केला गेला होता. बांगलादेशमधील एका प्रसिद्ध वृत्तपत्राने ढाका मेट्रोपोलिटन पोलिस अधिकार्यांच्या हवाल्याने हा दावा केला होता.
पोलिसांनी काय सांगितलं?
“बांगलादेश पोलिसांकडून औपचारिक किंवा अनौपचारिक असा कोणताही संदेश मिळालेला नाही. तसेच रिपोर्टमध्ये नाव असलेला कोणताही आरोपी गारो हिल्समध्ये आढळून आलेला नाही आणि कोणालाही अटक करण्यात आलेली नाही,” असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने फोनवरून हिंदूस्तान टाइम्सशी बोलताना सांगितले.
रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, दोन आरोपींना स्थानिक मध्यस्थांनी मदत केली होती. तसेच कथितपणे सीमा ओलांडून आल्यानंतर पूर्ती नावाच्या व्यक्ती त्यांना भेटला, तर सामी नाव असलेला टॅक्सी चालक त्यांना तुरा येथे घेऊन गेला .
कथित सीमा ओलांडणे किंवा पूर्ती आणि सामी यांचा सहभाग असल्याची कोणतीही गुप्तचर माहिती, ग्राउंड व्हेरिफिकेशन किंवा ऑपरेशनल पुरवा अस्तित्वात नाही, असे सांगत मेघालय पोलिसांनी हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.
“मेघालयात कुठेही पूर्ति किंवा सामी या दोघांचीही ओळख पटलेली नाही, तसेच त्यांचा शोध लागलेला नाही किंवा त्यांना अटक करण्यात आलेली नाही. भारतीय अधिकार्यांशी समन्वय साधणे किंवा कोणतीही पडताळणी केल्याशिवाय हे कथानक रचल्याचे दिसून येत आहे,” असे पीएचक्यू अधिकाऱ्याने सांगितले.
बीएसएफने काय सांगितले
पोलिसांच्या म्हणण्याला दुजोरा देत सीमा सुरक्षा दल (मेघालय फ्रंटीयर) इन्स्पेक्टर जनरल ओपी उपाध्याय यांनी देखील दावा फेटाळून लावला आहे. ते म्हणाले की, “मेघालयच्या हलुआघाट सेक्टरमधून या व्यक्तींनी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून प्रवेश केल्याचा कोणताही पुरवा अद्याप उपलब्ध नाही. अशी कोणतीही घटना बीएसएफच्या निदर्शनात आलेली नाही किंवा त्याची नोंदही झाली नाही. हे दावे पूर्णपणे निराधार दिशाभूल करणारे आहेत.” पुढे बोलताना उपाध्याय असेही म्हणाले की, बीएसएप काटेकोरपणे पडताळणी केल्या गुप्तचर माहितीवर आणि प्रस्थापित बॉर्डर मॅनेजमेंट प्रोटोकॉल्सवर काम करते.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, खोटी माहिती पसरवली गेल्याची ही पहिलीच वेळ नाही. जवळपास दोन आठवड्यांपूर्वी असेच एक बनावट वृत्त बांगलादेशच्या माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. ज्यामध्ये घुसघोरी करणाऱ्या दोन बांगलादेशींना बीएसएफने गोळ्या घातल्याचे म्हटले होते. हा दावा देखील पडताळणी केल्यानंतर भारतीय अधिकार्यांनी फेटाळून लावला होता.
मेघालय पोलिस आणि बीएसएफने हे स्पष्ट केले आहे की ते बांगलादेशच्या अधिकाऱ्यांबरोबर सहकार्य करण्यास तयार आहेत, मात्र, त्यांनी स्पष्ट केले की, फक्त अधिकृत माध्यमांतून देण्यात आलेल्या आणि पडताळणी केलेल्या माहितीवरच कारवाई केली जाईल.
