देशातील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणानंतर आता ताजमहालबाबत वाद सुरू झाला आहे. भाजपा नेते रजनीश यांनी अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल करून ताजमहाल प्रत्यक्षात तेजो महाल असल्याचा दावा केल्याने वाद वाढत आहे. त्यांनी ताजमहालच्या तळघरातील २२ खोल्या उघडण्याची मागणी केली आहे. या वादात आता जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी उडी घेतली आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी ताजमहालबाबत भाजपला आव्हान दिलं आहे.

“तुमच्यात हिम्मत असेल तर ताजमहाल आणि लाल किल्ल्याचं मंदिर बनवून दाखवा. मग बघू किती लोकं हा देश बघण्यासाठी इथे येतात.” असं आव्हान माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिलं आहे लोकांचे लक्ष वळवण्यासाठीच हा वाद निर्माण केला जात असल्याचे आरोपही मेहबूबा मुफ्ती यांनी केला. “मुघलांच्या काळात ताजमहाल, मशिदी, किल्ले बांधले गेलेत, त्या त्यांना खराब करायच्या आहेत. म्हणून त्यांच्या मागे पडून आहेत. यातून काहीच मिळणार नाही.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

भाजप सरकारकडे जनतेला देण्यासारखे काहीच नाही, असा टोला पीडीपी प्रमुखांनी लगावला आहे. बेरोजगारी, महागाई या सगळ्यात वाढ होत आहे. देशाची संपत्ती विकली जात आहे. आपला देश आता गरिबीच्या बाबतीत बांगलादेश, पाकिस्तान आणि नेपाळच्या मागे पडला आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानशी चर्चा करणे आवश्यक आहे, असे मेहबूबा मुफ्ती यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. खोऱ्यात सैन्य वाढवून काहीही होणार नाही, असंही त्या म्हणाल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे वाद?
इतिहासकार पीएन ओक यांच्या ‘ट्रू स्टोरी ऑफ ताज’ या पुस्तकावरून ताजमहालचा वाद सुरू झाला होता. या पुस्तकात ताजमहाल हे शिवमंदिर असल्याबाबत दावा करण्यात आला आहे. काही इतिहासकारांचा मते, ताजमहालमध्ये मुख्य समाधी आणि चमेलीच्या मजल्याखाली २२ खोल्या आहेत, ज्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यावर लोखंडी जाळी लावून ते बंद करण्यात आले आहेत. सुमारे ४५ वर्षांपूर्वीपर्यंत पायऱ्या उतरून जाण्याचा मार्ग खुला होता. या २२ खोल्या उघडण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.