जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती याचा डीएनए दोषपूर्ण आहे आणि त्यांनी स्वतः भारतीय असल्याचे सिद्ध करावे लागेल, असं वक्तव्य हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी आज केलंय. मेहबुबा मुफ्ती यांच्या कालच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना अनिल विज असं म्हणाले. मेहबुबा मुफ्ती यांनी सोमवारी ट्विट करत भारत पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणार्‍या काश्मिरींच्या विरोधात उमटलेल्या प्रतिक्रियांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

अनिल विज यांनी हे वक्तव्य करण्यापूर्वी ट्विट देखील केले होते. त्यात त्यांनी म्हटलंय की, “पाकिस्तानने भारताविरोधातील क्रिकेट सामना जिंकल्यावर भारतात फटाके फोडणाऱ्यांचा डीएनए भारतीय असूच शकत नाही. तुमच्या घरात लपलेल्या गद्दारांपासून सावध रहा.”

मुफ्ती यांनी सोमवारी ट्विट केले की, “पाकच्या विजयाचा आनंद साजरा करणार्‍या काश्मिरींवर इतका राग का? काही जण तर ‘देश के गद्दारों को गोली मारो’, किंवा ‘देशद्रोह्यांना गोळी मारा’,” अशा घोषणा देत आहेत. जम्मू आणि कश्मीरचे विभाजन केले आणि ऑगस्ट २०१९ मध्ये राज्याचा विशेष दर्जा काढून टाकण्यात आल्यावर मिठाई वाटून उत्सव साजरा केला गेला हे कोणीही विसरलेलं नाही,” असं त्यांनी म्हटलं होतं.

टी-२० विश्वचषकात २४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तानदरम्यान सामना झाला. या सामन्यात पाकिस्तानने १० गडी राखून भारताचा पराभव केला. या पराभवानंतर काही ठिकाणी फटाके फोडून पाकिस्तानचा विजय साजरा करण्यात आला होता. त्यावरून विज यांनी मेहबुबा मुफ्ती यांच्यावर निशाणा साधला.