Mehbooba Mufti On Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याचं चित्र निर्माण झालं आहे. भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक मोठे निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील ५० पर्यटनस्थळे बंद करण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीर सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये भीती निर्माण झाल्यामुळे आणि येथील पर्यटनस्थळे बंद करण्यात आल्यामुळे येथील पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे येथे असणाऱ्या हॉटेल चालक आणि टॅक्सी चालकांना आता आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारकडे एक मागणी केली आहे. ‘पुढील एक वर्षभरासाठी येथील हॉटेल आणि टॅक्सी चालकांच्या कर्जावरील व्याज माफ करण्यात यावं’, असं मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने एक्सवर (ट्विटर) दिलं आहे.

मेहबूबा मुफ्ती काय म्हणाल्या?

“पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी घडलेली दहशतवादी हल्ल्याची घटना जम्मू कश्मीरच्या लोकांसाठी धक्कादायक होती. काश्मिरी नागरिकांनी आपलं जीवन धोक्यात घालून पर्यटकांची देखभाल करत मदत केली. काश्मिरी नागरिकांनी दाखवून दिलं की ते या दुःखात देशाबरोबर आहेत. पहलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचं सर्वात जास्त दु:ख जर कोणाला असेल तर ते येथील लोकांना आहे. ही घटना पहलगामच्या लोकांसाठी धक्कादायक होती. या घटनेवेळी जास्तीत जास्त पर्यटकांचा जीव वाचवण्यासाठी येथील लोकांनी खूप प्रयत्न केले”, असं मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे.

“तुम्ही (केंद्रीय गृहमंत्री) दहशतवाद्यांवर केली पाहिजे. मात्र, आज पहलगाममधील १०० लोकांपेक्षा जास्त काश्मिरी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मी आवाहन करत आहे की हे योग्य नाही. आज सर्व पर्यटनस्थळे बंद आहेत. मग अशा परिस्थितीत पर्यटन स्थळांवर सुरक्षा दल तैनात करण्याची आवश्यकता आहे. तसेच मी सरकारला आवाहन करते की पहलगाममध्ये पर्यटकांना घोडे पुरवणाऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच पर्यटनस्थळे बंद झाल्याने वर्षभरासाठी हॉटेल आणि टॅक्सी चालकांच्या कर्जावरील व्याज माफ करण्यात यावं”, अशी मागणी मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे.